लोकसत्ता टीम
नागपूर : दोन दिवसांपूर्वी नागपुर शहराला मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या तलावाचे पाणी नागपुरच्या सखल भागात शिरले. यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर जोरदार टीका केली आहे.
आता तरी ते आणि त्यांचा ‘परिवार’ काही ‘चिंतन’ करणार आहेत का? मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झाले यावर काय म्हणणे आहे? नागपूर कोणी बुडवले? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. त्याचे आधी उत्तर द्या आणि मगच नागपूरच्या विकासाच्या वल्गना करा… अशा शब्दात टीका करण्यात आली आहे.
आणखी वाचा-“नागपुरात आलेला पूर मानवनिर्मित! नागनदीचा नाला कोणी केला,” विकास ठाकरे यांचा सवाल
एरवी मुसळधार पावसाने मुंबईत पाणी साचले की, शिवसेनेकडे बोट दाखविणारे तुम्हीच आहात ना? मग आता ज्या नाग नदीतून बोटी चालविण्याचे स्वप्न तुम्ही दाखविले त्याच नाग नदीत हजारो कुटुंबांची घरेदारे, संसार, गाडय़ा वाहून जाताना पाहण्याची वेळ नागपूरकरांवर का आली? त्यासाठी कोणाकडे बोट दाखवायचे? याच नाग नदीच्या महापुरात तुमच्या तथाकथित विकासाचा आज चिखल झाला आहे आणि त्या चिखलात सामान्य नागपूरकर आपले किडुकमिडुक शोधत वणवण फिरत आहेत. त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.