अकोला : शिवसेना शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा काढून पक्षांतर केलेल्या खासदारांसह सत्ताधारी पक्षावर घणाघात केला. वाशीम येथील ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचा उमेदवाराच जाहीर केला. वाशीम विधानसभा मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना आमदार करायचे असून आतापासून कामाला लागण्याचे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले.
वाशीम येथील ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, नितीन देशमुख आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह भाजपचा खरपूस शब्दात समाचार घेतला.
‘मुलीची सोयरिक नव्हे तर स्वत:च्या खोक्यांची बोलणी’
आपले नऊ खासदार ‘मशाल’ चिन्हावर निवडून दिले. या ठिकाणच्या खासदाराने अगोदर सुद्धा गद्दारी केली होती. आईच्या नावाने खोटं बोलले. पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली, तेव्हा यांनी संपर्क साधला. मुलीच्या सोयरीकची बोलणी असल्याचे कारण सांगितले.तेव्हा हा स्वत:च्या हुंड्याची म्हणजेच खोक्यांची बोलणी करीत होता, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी खा. संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
तयारीला लागा
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वाशीम मतदारसंघातून सिद्धार्थ देवळेंना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी लाखावर मते घेतली होती. दरम्यान, मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केले. आतापासूनच तुम्ही तयारीला लागा, तीन वर्ष तुमच्या हातात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांच्या अंगात दोन थेंब तरी निष्ठेचे रक्त हवे
वाशीम-यवतमाळ मतदारसंघात गद्दारीची कीड लागली. अगोदरच्या खासदारांनी गद्दारी केली, त्यानंतर नवीन बुजगावणे उभे केले. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून त्यांचे स्वप्न साकारले. त्याने आता गद्दारी केली. आई, मुली व मतदारांशी खोटा बोलणारा येथील खासदार आहे. या गद्दारांच्या अंगात दोन थेंब तरी निष्ठेचे रक्त दिले पाहिजे. गद्दारीच्या किडीला गाडायचे आहे. त्याला लोकसभेची उमेदवारी देण्याचा गुन्हा केला होता. त्याच गुन्ह्याची माफी मागण्यासाठी आलो आहे. गद्दार गेला तरी मी उभा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार दिसेल तिथे जाब विचारण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
