नागपूर : विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि छत्तीसगड-ओडिशा मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत रेल्वे प्रशासनाने उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस त्रिसाप्ताहिकऐवजी दररोज चालविण्याची घोषणा केली आहे. ९ जुलै २०२६ पासून हा निर्णय लागू होत असून प्रवाशांना अधिक नियमित सेवा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीची दखल
प्रवाशांची वाढती गर्दी, नियमित प्रवासाची गरज आणि विविध भागांतील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस दररोज चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही गाडी त्रिसाप्ताहिक स्वरूपात धावत होती. नव्या निर्णयानुसार गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ९ जुलै २०२६ पासून दररोज उधना येथून सुटेल, तर गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस १० जुलै २०२६ पासून ब्रह्मपूर येथून दररोज धावेल.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला मोठा लाभ
या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर तसेच विदर्भातील अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर आणि गोंदिया येथील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय छत्तीसगडमधील दुर्ग, रायपूर तसेच ओडिशातील ब्रह्मपूरपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होईल.
अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा
उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेसला बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलागढ, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपूरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड आणि पलसा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
२२ डब्यांची आधुनिक रचना
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीचा विचार करून एकूण २२ डब्यांची संरचना करण्यात आली आहे. यामध्ये ११ सामान्य श्रेणीचे डबे, ८ स्लीपर श्रेणीचे डबे, १ पँट्री कार तसेच २ दिव्यांगजन, लगेज आणि गार्ड यांच्यासाठी संयुक्त डबे असतील. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून करण्यात आलेला हा निर्णय विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून नियमित सेवा उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर, नियोजनबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
