गडचिरोली : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांनी नुकतीच गडचिरोलीतील ‘सर्च’ संस्थेला दोन दिवसांची भेट देत येथील कामाचा जवळून अनुभव घेतला. गेल्या चार दशकांपासून ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्यसेवा, संशोधन आणि समाजपरिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या सर्चच्या कार्यपद्धतीने दोघेही भारावून गेले.
या भेटीदरम्यान त्यांनी सर्चच्या विविध सामुदायिक आरोग्य प्रकल्पांची, संशोधन उपक्रमांची आणि आरोग्यसेवेच्या नाविन्यपूर्ण मॉडेलची माहिती घेतली. डॉक्टर, आरोग्यदूत, संशोधक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी दुर्गम भागातील लोकांसाठी सुरू असलेल्या सेवाकार्याची जवळून ओळख करून घेतली.
यावेळी उमेश आणि प्रिया यांनी शोधग्राम या सर्चच्या परिसरालाही भेट दिली. निसर्गाच्या सान्निध्यात उभारलेला हा परिसर, साधेपणातून उभे राहिलेले काम आणि येथील माणुसकीची ऊब याचा दोघांवरही विशेष प्रभाव पडला. गडचिरोलीच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीची, येथील निसर्गसौंदर्याची आणि स्थानिक जीवनशैलीची त्यांनी मनापासून अनुभूती घेतली. यावेळी दोघांनीही ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि सर्चमधील सहकाऱ्यांकडून संस्थेचे कार्य समजून घेतले.

ही भेट केवळ एका संस्थेच्या कामाची माहिती घेण्यासाठी नव्हती, तर संशोधन, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेली बांधिलकी यांचा संगम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी होती. दुर्गम भागातही जिद्द, विज्ञान आणि माणुसकीच्या बळावर हजारो कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, याची प्रचीती या भेटीतून दोघांनाही आली.
भेटीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी सर्चचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. गडचिरोलीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या भेटीमुळे अधिक व्यापक झाला असून, येथून मिळालेली प्रेरणा आणि अनुभव आयुष्यभर स्मरणात राहतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
