नागपूर : गोठणगाव गँग, गोठणगाव एक्प्रेस अशा एक ना अनेक नावांनी प्रसिद्ध झालेल्या ‘एफ टू’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच आहे. ते लहान होते तेव्हाही त्यांचा कौतुक सोहोळा पार पडत होता. आता ते मोठे झालेत तरीही त्यांची प्रसिद्धी, किर्ती दूरपर्यंत पसरली आहे. त्यांना एकत्रित पाहणे हाच मोठा आनंदाचा क्षण आहे आणि असाच एक क्षण डॉ. ऐश्वर्या फटिंग यांनी टिपला आहे.
लहानपणापासूनच बिनधास्त
लहान असतांना त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली, पण हा प्रकार पर्यटकांसह जिप्सीचालक आणि वाहकांच्याही अंगलट आला. अवघ्या काही महिन्याच्या या बछड्यांनी वनविभागाला थेट कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावल्या. त्यामुळे पर्यटक त्यांच्यापासून चार हात लांबच राहतात. तरीही त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मात्र त्यांच्यात होड लागली असते. कधी ते कृत्रिम पाणवठ्यावर असलेल्या पाईपसोबत खेळताना दिसतात. तर कधी हे एकत्रित कुटूंब बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसून येते.
उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याची ओळख
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ नंतर कधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा झाला ते कळलेच नाही. कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. त्यानंतर पुन्हा पर्यटकांनी पाठ फिरवली. आता ‘एफ-२’ नावाची वाघीणसुद्धा तिच्या पाच बछड्यांसह पर्यटकांना आकर्षित करत आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ‘एफ-२’ वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ते पर्यटकांना भुरळ घालत आहेत.
‘हे’ आहे वाघिणीचे कूळ
एफ-२ वाघीण ही फेअरी वाघिणीची मुलगी आहे. एन-४ आणि पाटील नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता. सध्या या परिसरात जे-मार्क नावच्या वाघाचा दबदबा आहे. नवंवर्षानिमित्त नागपूरच नाही तर विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावले नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडे वळली आहेत. या जंगलात वाघाचे हमखास दर्शन पर्यटकांना होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढीस लागली आहे. सध्या ही वाघीण आपल्या पाच बछड्यांसह गोठणगाव गेट परिसरात फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
