नागपूर : एका जंगलातून दुसऱ्या जंगलाकडे… नव्या अधिवासाच्या शोधात निघालेला तरुण नर वाघ आता पेंचच्या जंगलात दाखल झाला आहे. उमरेड-कर्हांडला वन्यजीव अभयारण्यातील गोठणगाव झोनमधून पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या चोरबाहुली क्षेत्रात आलेल्या या वाघामुळे पुन्हा एकदा ‘टायगर मायग्रेशन’ अर्थात वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराचा विषय चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, हा वाघ उमरेड-कर्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-२ वाघिणीच्या पाच बछड्यांपैकी एक नर बछडा असल्याचे त्याच्या अंगावरील पट्ट्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेवरून ओळखण्यात आले आहे.
सफारीचा रोमांचक अनुभव
शुक्रवारी दुपारच्या सफारीदरम्यान या नव्या पाहुण्याचे पर्यटकांना दीर्घकाळ दर्शन झाले. जंगलालगत केलेल्या शिकारीवर ताव मारल्यानंतर या वाघाने काही काळ पाण्याच्या डबक्यात विसावा घेतला. त्यानंतर परिसरात फिरत त्याने विविध ठिकाणी टेरिटरी मार्किंग अर्थात क्षेत्रचिन्हांकन केले. शिकारीपासून ते पाणवठ्यावरील विसाव्यापर्यंत आणि त्यानंतरच्या क्षेत्रचिन्हांकनापर्यंत वाघाच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्याची संधी पर्यटकांना मिळाली. या संपूर्ण घडामोडींमुळे सफारीचा अनुभव अधिकच रोमांचक ठरला.
गोठणगाव ते चोरबाहुली; स्वतंत्र अधिवासाच्या शोधात!
अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा हा नर वाघ उमरेड-कर्हांडला अभयारण्यातील गोठणगाव झोनमधून पेंचच्या चोरबाहुली क्षेत्रात आल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. उमरेड-कर्हांडला येथील प्रसिद्ध एफ-२ वाघिणीच्या पाच बछड्यांपैकी हा एक असल्याचे त्याच्या शरीरावरील पट्ट्यांच्या रचनेच्या आधारे ओळखण्यात आले आहे. वाघांच्या जीवनचक्रात विशिष्ट वयानंतर स्वतंत्र अधिवासाचा शोध घेण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. विशेषतः तरुण नर वाघ मूळ अधिवास सोडून नवीन क्षेत्राच्या शोधात लांबचा प्रवास करतात. या प्रक्रियेत ते नवीन जंगलांमध्ये प्रवेश करून तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. उमरेड-कर्हांडला ते पेंच असा या तरुण वाघाचा प्रवास याच दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पट्ट्यांच्या रचनेतून उलगडली वाघाची ओळख!
वाघाच्या शरीरावरील काळ्या पट्ट्यांची रचना ही त्याची स्वतंत्र ओळख असते. प्रत्येक वाघाचा स्ट्राइप पॅटर्न वेगळा असल्याने छायाचित्रांच्या तुलनात्मक निरीक्षणातून त्याची ओळख पटविणे शक्य होते. याच वैशिष्ट्यपूर्ण पट्ट्यांचे बारकाईने निरीक्षण करून ‘डेक्कन ड्रिफ्ट्स’चे वन्यजीव अभ्यासक पियुष आकरे , चोरबाहुली गेटचे गाईड वन मार्गदर्शक अजय सोंटक्के आणि अविनाश चौधरी यांनी या वाघाची ओळख पटवली. सफारीदरम्यान या तिघांनी वाघाच्या विविध हालचाली आणि त्याचे देखणे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
वाघांच्या सुरक्षित स्थलांतरातून संवर्धनाला बळ
वाघांचे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात होणारे नैसर्गिक स्थलांतर हे व्याघ्रसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. जंगलांचे संरक्षण, वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास आणि जंगलांमधील नैसर्गिक जोडमार्ग यांमुळे वाघांना नवीन क्षेत्रांमध्ये जाण्याची संधी उपलब्ध होते. अशा स्थलांतरामुळे वाघांना स्वतंत्र अधिवास शोधण्यास मदत होण्याबरोबरच विविध जंगलांमधील व्याघ्रसंख्येचे नैसर्गिक संतुलन राखण्यासही हातभार लागू शकतो, असे ‘डेक्कन ड्रिफ्ट्स’चे प्रमुख आणि वन्यजीव अभ्यासक पियुष आकरे यांनी सांगितले.
