नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यात शनिवारी अचानक सीआयडी पोहोचल्याने एकच खळबळ उडाली. व्यवस्थापनाचीही अवस्था नेमकी काय करावे आणि काय करू नये अशी झाली होती. सीआयडीने संपूर्ण जंगल पिंजून काढल्यानंतर त्यांना जे हवे होते ते मिळाले. नंतर त्यांनी अभयारण्य व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.
हे अभयारण्य जागतिक पर्यटन नकाशावर
‘जय’ या वाघाने नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर कोरले. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना या जंगलाची ओढ लावली. त्यातल्याच एका मोठ्या झालेल्या मादी बछड्याने म्हणजेच ‘एफ२’ वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला. मात्र, जेवढी तिची आई म्हणजेच ‘फेअरी’ वाघीण प्रसिद्ध झाली नव्हती, तेवढे ‘एफ२’ वाघीण आणि तिचे पाच बछडे जगभरात प्रसिद्ध झाले. अगदी लहान असताना पर्यटकांनी केलेल्या कोंडीमुळे अनेक गाईड, जिप्सी ड्रायव्हर आणि पर्यटक सुद्धा निलंबित झाले. एवढेच नाही तर या प्रकारामुळे अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पात मोबाईल वापरास बंदी आली.
जंगलप्रेमी एसीपी प्रद्युम्न
टीव्ही चॅनल्सवर अतिशय गाजलेली मालिका ‘सीआयडी’ आणि त्या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आजही तेवढेच आठवणीत आहे. या मालिकेत एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम जंगलप्रेमी आहेत. यापूर्वी देखील ते विदर्भात जंगलभ्रमंती साठी कुटुंबासह येऊन गेले आहेत. त्यावेळी त्यांनी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर ला भेट दिली. भारतातील हे पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर बघून ते आश्चर्यचकित झाले होते. यावेळी त्यांनी उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याला भेट देत जंगलभ्रमंती केली. त्यांना ‘एक्स मार्क’ नावाची वाघीण, बछडे, या अभयारण्यातील ‘कॉलरवली’ वाघीण दिसली. व्याघ्रदर्शनामुळे एसीपी प्रद्युम्न उर्फ शिवाजी साटम हे आनंदी झाले.
अभयारण्य प्रशासनाकडून स्वागत
सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी कऱ्हाडला पर्यटन सफारी गेटला भेट दिली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती आरती उके तसेच वनपाल संजय खडोदे यांनी कॉफी टेबल बुक देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच स्मृतिचिन्ह आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचे कॅलेंडर भेट देऊन त्यांचा सन्मान केला. उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभ्यारण्याविषयी त्यांना माहिती दिली. त्यांनीही उत्सुकतेने या अभयारण्याविषयी सर्व काही उत्सुकतेने जाणून घेतले. सफारीदरम्यान त्यांना वन्यप्राणी व्याघ्र दर्शन झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच या अभयारण्यात पुन्हा एकदा येण्याची इच्छा बोलून दाखवली.
