भंडारा :  उमरेड-पवनी- कऱ्हांडला वाईल्ड लाईफ सेंचुरी मधील पवनी गेट सध्या ‘हमखास वाघ दर्शन’साठी ओळखले जाऊ लागले आहे. पवनी गेट पर्यटकांची पहिली पसंती बनले आहे. ‘वाघ दिसण्याची जास्त शक्यता’ हीच ओळख या गेटला मिळू लागल्याने इतर प्रवेशद्वारांच्या तुलनेत पवनीकडे पर्यटकांचा कल स्पष्टपणे वाढताना दिसत आहे. सफारी बुकिंगपासून प्रत्यक्ष भेटीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पवनी गेटला प्राधान्य दिले जात आहे.

N-4, PT-1  हे रुबाबदार वाघ आणि T-20 (शॅडो) या वाघिणींचा सातत्यपूर्ण वावर हा या आकर्षणा मागचा मुख्य घटक ठरतो आहे. पाणवठे, दाट जंगल आणि मुबलक भक्ष्यसाखळीमुळे वाघिणी या  वनपरिक्षेत्रामध्ये वारंवार दिसतात. परिणामी, सकाळच्या थंडगार वातावरणात किंवा संध्याकाळच्या शांत वेळेत पर्यटकांना अगदी जवळून वाघ दर्शनाचा रोमांच अनुभवायला मिळतो. अनेक पर्यटकांनी ‘पहिल्याच सफारीत वाघ’ पाहिल्याचा अनुभव सांगितल्याने पवनी गेटची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

पवनी गेट हे केवळ वाघ-वाघिणींच्या दर्शनासाठीच नव्हे, तर समृद्ध जैवविविधतेसाठीही प्रसिद्ध होत आहे. येथे सफारीदरम्यान अनेक प्रकारचे वन्यजीव आणि पक्षी पाहायला मिळतात, त्यामुळे हा अनुभव केवळ ‘टायगर सफारी’पुरता मर्यादित राहत नाही—तर पूर्ण जंगलजीवनाचा थरार अनुभवायला मिळतो. जेवण परिक्षेत्रात चितळ, सांबर, नीलगाय, रान कुत्रे, बिबट्या, भालू याशिवाय मोर, गरुड, सर्प गरुड, किंगफिशर, बगळे, जल पक्षी अशा विविध प्रकारच्या पक्षांचे देखील दर्शन होते. एकंदरीत, पवनी गेट म्हणजे फक्त ‘वाघ दर्शन’ नव्हे, तर संपूर्ण जंगलाच्या जीवनाचा जवळून अनुभव देणारे ठिकाण आहे.

सफारीच्या वेळेस गेटवर दिसणारी पर्यटकांची रांगच या वाढत्या आकर्षणाची साक्ष देत आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूरसह राज्यातील विविध भागांतूनच नव्हे, तर देशभरातून पर्यटक येथे येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ या गेटची ‘हॉट डेस्टिनेशन’ म्हणून ओळख अधिक मजबूत करत आहेत.

या यशामागे नैसर्गिक कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणवठ्यांभोवती वाघांचा वावर वाढतो. पवनी रेंजमध्ये पाण्याची उपलब्धता आणि भक्ष्यसाखळी मजबूत असल्याने वाघिणी या भागात स्थिरावल्या आहेत. त्यामुळे सफारी मार्गांवर त्यांची उपस्थिती वारंवार दिसून येते आणि पर्यटकांना ‘लाइव्ह’ वाघ दर्शनाचा अनुभव मिळतो.

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वनविभागानेही खबरदारीची पावले उचलली आहेत. सफारी मार्गांचे काटेकोर नियोजन, वाहनांवर नियंत्रण आणि पर्यटकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना यामुळे जंगलातील शिस्त अबाधित ठेवली जात आहे. वाघांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील प्रमुख वनपर्यटन केंद्र म्हणून अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.