अमरावती : काकाने दोन वर्षीय चिमुकल्या पुतण्याची पायाखाली तुडवून हत्या केल्‍याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील पोहराबंदी येथे उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी काकास अटक करण्यात आली आहे. अमित संजय भोयर (२, रा. पोहराबंदी) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी पूजा संजय भोयर (२५) यांच्या तक्रारीवरून दीपक उर्फ बाल्या अजाबराव भोयर (३२, रा. पोहराबंदी) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पूजा व संजय यांचे पाच ते सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना तीन अपत्ये आहेत. संजयसोबत नेहमी वाद होत असल्याने काही महिन्यांपूर्वी पूजा ही चिमुकल्या अमितसह माहेरी शिरपूरला निघून गेली होती. दरम्यान, दीपक हा वहिनी पूजा यांच्या माहेरी गेला. मी तुझ्यावर प्रेम करतो, मुला चांगले ठेवेन, असे म्हणून तो तिला पोहराबंदी येथे घेऊन आला. ते दोघे सोबत राहू लागले. परंतु, दीपक हा चिमुकल्या अमितवरून पूजासोबत वाद घालत होता.

हेही वाचा >>> अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या आणि स्वतःच फोन करून दिली माहिती

एप्रिलमध्ये दीपकने पूजासोबत वाद घालून तिच्यासह चिमुकल्या अमितला मारहाण केली होती. त्यावेळी फ्रेजरपुरा ठाण्यात मारहाणीचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर पूजा ही चिमुकल्या अमितसह पुन्हा माहेरी शिरपूरला निघून गेली. दरम्यान, ऑगस्टमध्ये अमितची प्रकृती बिघडल्याने पूजा त्याला घेऊन जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात आली. याबाबत माहिती मिळाल्यावर दीपक पुन्हा पूजाकडे गेला. त्याने पूजाची माफी मागून पुन्हा असे करणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर तो तिला अमितसह पुन्हा आपल्यासोबत गावी पोहराबंदी येथे घेऊन आला. काही दिवस चांगला राहिल्यानंतर मंगळवारी रात्री कामावरून घरी परतल्यावर दीपकने पुन्हा वाद घातला. तिला शिवीगाळ करून मारहाणसुद्धा केली. त्याचवेळी अमितचा रडण्याचा आवाज आला. त्यावर दीपकने त्याला पाळण्यातून उचलून खाली फेकले. त्याला पायाखाली तुडवले. त्यात अमितचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर दीपकने याबाबत कुणाला काहीही न सांगण्यासाठी पूजाला धमकी दिली. त्यानंतर त्याने गावच्या पोलीस पाटील यांना मुलाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. त्यावर पोलीस पाटील यांनी त्याला बाळाला दवाखान्यात नेण्याचे सूचविले. पण, याबाबत पोलीस पाटील यांच्यासह गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पूजासह दीपकची कसून चौकशी केली. यावेळी पूजाने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दीपकविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.