अकोला : चारधाम यात्रेवर गेलेल्या अकोला जिल्ह्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. उत्तराखंडमधील श्रीनगर गढवाल येथील श्रीकोट येथे अनियंत्रित भरधाव टँकरने महिलांना चिरडल्याची भीषण दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात अकोला जिल्ह्यातील दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या बद्रीनाथ येथून दर्शन करून आल्यावर हा अपघात झाल्याची माहिती आहे.

अकोला व अमरावती जिल्ह्यातील सुमारे १२० भाविक चारधाम यात्रेतील बद्रीनाथ येथे दर्शनाला गेले आहेत. भाविकांनी बद्रीनाथ येथे दर्शन केले. त्यानंतर सर्व भाविक उत्तराखंडमधील श्रीनगर गढवाल येथील श्रीकोट येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास भाविक महिला हॉटेलबाहेर बसून चर्चा करीत होत्या. त्यावेळी काळ बनून पाण्याचा टँकर आला. अचानक भरधाव वेगात एक पाण्याचा टँकर अनियंत्रितरित्या झाला. हा टँकर श्रीनगर येथून श्रीकोटला जात होता. यादरम्यान त्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्या अनियंत्रित टँकरने सुरुवातीला एका गायीच्या बछड्याला जोरदार धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित टँकरने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या भाविक महिलांना चिरडत नेले. पुढे तो टँकर एका भिंतीला जाऊन धडकला. या भीषण अपघातात अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा शहरातील ललिता हरीश टावरी (४४) आणि सरिता उर्फ गौरी नरेश (४५) या दोन महिलांचा मृत्यू झाला. सारिका राजेश राठी (४६), संतोषी धनराज राठी (४५), मधुबाला राजेंद्र कुमार (५४) या जखमी झाल्या आहेत. अपघात एवढा भीषण होता की टँकरखाली चिरडलेल्या महिलांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. अपघातातील सर्व जखमी भाविक महिलांना तात्काळ श्रीनगरच्या गढवाल येथील बेस रुग्णालयात उपचारासाठी आणले.

हेही वाचा…यवतमाळ : ‘जयभीम’वाला उमेदवार देणार का? लक्षवेधी फलकांची चर्चा

डॉक्टरांनी ललिता टावरी यांना तपासून मृत घोषित केले, तर सरिता यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. इतर तीन महिलांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या एका महिलेच्या पायाचे हाड मोडले असून इतर दोघींना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मृत्यू झालेल्या भाविक महिलांवर हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या अपघाताची उत्तराखंड पोलीस चौकशी करीत आहे. दरम्यान, धारधाम यात्रेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने अकोला जिल्ह्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.