वर्धा : जागतिक वारसा स्थळ म्हणजे ज्याच्या संरक्षणाची जबाबदारी संपूर्ण जगावर असते. युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) त्यास मान्यता देते. हे एक असे खास ठिकाण असते ज्यास मानवी इतिहास, संस्कृती किंवा निसर्गाच्या दृष्टीने अद्वितीय महत्व असते. याच वारसा स्थळाच्या यादीत भारताने मजल मारली आहे. त्याचीच ही सुखद बातमी.
केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची माहिती
भारताच्या समृद्ध आणि प्रदीर्घ सांस्कृतिक वैभवाची जागतिक पटलावर पुन्हा मोहोर उमटली आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत भारताच्या पाच नव्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या समावेशामुळे भारताच्या युनेस्को संभाव्य यादीतील एकूण स्थळांची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा प्राचीन नागरी वारसा जतन करणे, त्याचे संरक्षण करणे आणि तो जगासमोर प्रभावीपणे मांडणे या राष्ट्रीय ध्येयाला या निर्णयामुळे मोठे बळ मिळाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
स्थान मिळवणारे ५ वारसे
१) बाघ लेणींची भित्तिचित्रे (धार, मध्य प्रदेश) – विंध्याचल पर्वतरांगेच्या पायथ्याशी आणि वाघिणी नदीकाठी वसलेल्या या ९ बौद्ध लेणींमधील ४ थ्या ते ६ व्या शतकातील भित्तिचित्रे अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साधर्म्य दर्शवणारी असून प्राचीन भारतीय चित्रकलेचा अजोड नमुना मानली जातात.
२) उदयगिरी लेणी (विदिशा, मध्य प्रदेश) – गुप्तकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट आविष्कार असलेल्या या २० रॉक-कट लेणींमध्ये भगवान विष्णूच्या वराह अवताराचे भव्य आणि जगप्रसिद्ध शिल्प भारतीय शिल्पकलेची भव्यता दर्शवते.
३) चंबल खोऱ्यातील मंदिरांचा समूह (मोरेना, मध्य प्रदेश) – ८ व्या ते ११ व्या शतकातील गुर्जरा-प्रतिहार आणि कच्छपघात घराण्याच्या काळातील बटेश्वर, पाडावली आणि काकरमठ या तीन प्रमुख मंदिर समूहांचा यात समावेश आहे.
४ ) गिन्नौरगड किल्ला (सिहोर, मध्य प्रदेश) – मध्य भारतातील गोंड राजवटीच्या शौर्याची आणि समृद्ध संस्कृतीची साक्ष देणारा हा ऐतिहासिक किल्ला त्याच्या दुर्गम दुर्गनिर्मिती आणि अद्ययावत जलव्यवस्थापनासाठी ओळखला जातो.
५) सत्याग्रह स्थळे (भारत आणि दक्षिण आफ्रिका) – महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या ‘सत्याग्रह’ तत्त्वज्ञानाचा जागतिक प्रवास दर्शवणारा हा आंतरराष्ट्रीय प्रस्ताव आहे. यात भारतातील ७ (साबरमती, सेवाग्राम, आगाखान पॅलेस, मणी भवन इत्यादी) आणि दक्षिण आफ्रिकेतील २ (पिटर्मारिट्झबर्ग स्टेशन, फिनिक्स सेटलमेंट) अशा एकूण ९ ऐतिहासिक गांधीयन ठिकाणांचा समावेश आहे.
जागतिक दर्जा दिशेने
युनेस्कोच्या नियमांनुसार कोणत्याही स्थळाला अंतिम ‘जागतिक वारसा दर्जा’ (World Heritage Site) मिळण्यापूर्वी त्याला संभाव्य (Tentative) यादीत स्थान मिळणे आणि तिथे काही काळ राहणे बंधनकारक असते. सध्या भारताकडे ४३ अधिकृत जागतिक वारसा स्थळे असून, या पाच नव्या प्रस्तावांमुळे भविष्यात भारताच्या अधिकृत जागतिक वारसा यादीत मोठी भर पडणार आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत अभिमानाची ठरणार. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमास देशभरातून लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. आता त्यावर युनेस्कोचे शिक्कामोर्तब होणार. डीडी न्यूजने याविषयी असे सविस्तर वृत्त दिले आहे.
