नागपूर : ती जेव्हा सुंदर होती, सर्वांगाणे परिपूर्ण होती, तेव्हा तिला कुठे ठेऊ आणि कुठे नाही असे सर्वांना होत होते. दुर्देवाने ती आजारी झाली. याच आजारपणात तिचे डोळे गेले आणि तिला लाडाने, कौतुकाने वाढवणाऱ्यांनी तिला अनाथाश्रमात आणून सोडले. तिची अवस्थाच इतकी वाईट होती की अनाथाश्रमातील कुणीही तिला जवळ घेईना. मात्र, रंगाने काळा असला तरी मनाने स्वच्छ असणाऱ्या एकाने तिच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला. एवढेच नाही तर तिची संपूर्ण जबाबदारी त्याने घेतली.
नागरिकांना विशेषत: उच्चवर्गियांना प्राणी पाळण्याचा प्रचंड शौक, पण तोच प्राणी त्रासदायक ठरु लागला तर मात्र त्याला दूर लोटून द्यायचे. वर्धा शहरातील करुणाश्रमात सहा महिन्यापूर्वी एका मालकाने त्याच्या पर्शियन मांजरीला आणून सोडले. कारण काय तर तिच्या अंगाला खरुज झाली होती आणि आजारामुळे ती पूर्ण आंधळी झाली होती. दिसायला प्रेमळ असल्याने करुणाश्रमातील सर्वांनी तिला ‘माया’ हे नाव दिले. ती आंधळी असल्याने करुणाश्रमातील इतर कोणतेही प्राणी तिला आपल्यात सामावून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे ती एकटीच फिरायची.
आंधळी असल्याने कुठेही धडकायची. इतर मांजरींनी देखील तिच्याशी मैत्री करणे टाळले. हा सर्व प्रकार करुणाश्रमातल्याच टप्पू(काळा श्वान)ला दिसला. त्याने मायाला मैत्रीचा हात दिला आणि दोघेही चांगले मित्र झाले. तिला डोळ्याने दिसत नसल्याने तो तिला सोबत घेऊनच फिरतो. ते दोघे जेवणच नाही तर आराम देखील सोबतच करतात. मालकाने टाकून दिले तरी रंगाने काळा असलेल्या टप्पूने मात्र तिला आधार दिला. आशिष गोस्वामी आणि त्यांच्या चमूने अशा अनेकांना करुणाश्रमात आधारच देत नाहीत, तर त्यांची काळजीदेखील घेतात.