नागपूर : गणेशोत्सवात दहा दिवस बाल गोपालांचा एक वेगळाच उत्साह असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरीही असेच चित्र होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचा छोटा का होईना स्वातंत्र अनुभव मिळावा म्हणूनन सर्व नातवांनी आजोबांकडे आग्रह धरला आणि चिमुकल्यांच्या आग्रहामुळे आजोबा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंचरत्न बाप्पांच्या प्रतिष्ठापनेची वेगळी परवानगी दिली. नातवांनी घरीच गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत विधिवत पूजा केली. नातवांच्या या उपक्रमाचे आजोबांनी भरभरुन कौतुक केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांसह नातवांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. गडकरी कुटुंबात पारंपारिक घरगुती गणपतीची स्थापना अनेक वर्षांपासून होत आहे. यंदाही ती स्थापना झाली आहे. मात्र नितीन गडकरींचे नातू नंदिनी, निनाद, सानवी, अर्जुन आणि कावेरी या पाच चिमुकल्या भावंडांनी एकत्र येऊन “पंचरत्न गणपती”ची स्थापना केली आहे. घरच्या वरच्या मजल्यावर एका मोकळ्या खोलीत चिमुकल्यांचे पंचरत्न गणपती विराजमान झाले आहेत. त्यांची विधिवत पूजा केली जात आहे. पाचही चिमुकल्या भावंडांनी एकत्रित येत त्यासाठी घरातच वर्गणी गोळा केली. त्यांना आजोबांनी सुद्धा वर्गणी दिली. बाजारात जाऊन मूर्ती पसंत केली. आवश्यक साफसफाई करत त्यांनी आपल्या कल्पकतेने विज्ञानाचे महत्त्व दाखवून देणारी सजावट केली आणि दुपारी घरीच चिमुकल्यांचे बाप्पा विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे, चिमुकल्यांच्या या गणेशोत्सवात त्यांचे आजोबा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी या नातवांचे भरभरुन कौतुक केले.
हे ही वाचा… गणराय पावले….. पहिल्याच दिवशी सोन्याचे दर…….
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, घरामध्ये पारंपारिक गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र नातवांनी इस्त्रोचे जसे स्टेशन आहे तशा स्टेशनचा देखावा बनवला. त्याच्यासाठी बाजारातून त्यांनी साहित्य आणले. त्यांची विज्ञानाबद्दलची जिज्ञासा असल्यामुळे त्याला मी समर्थन दिले. एवढ्या लहान वयात त्यांनी एक कल्पना राबवली हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या उत्सवात मी सहभागी झालो. श्रीगणेश हे आपल्या विद्येचे दैवत आहे. आपले ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आपली मोठी शक्ती आहे. येणाऱ्या काळात आपण विश्वगुरू बनणार आहोत.याचा संबंध ज्ञानाशी आहे. त्यासाठी भगवान गणेश आपल्याला आशीर्वाद देतील.
© The Indian Express (P) Ltd