नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १४ जानेवारी २०२३ रोजी जिवे मारण्याची धमकी देणारे तीन फोन आले होते. देशभरात खळबळ उडवून देणारी धमकी देणाऱ्याने अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा करून १०० कोटींची खंडणीची मागितली होती. अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी केला होता. त्या बद्दल जिगरबाज महिला पोलीस निरीक्षक एकुरके यांचा थेट देशाच्या गृहमंत्रालयाने गौरव करत त्यांची केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकासाठी निवड करण्यात आली आहे.
मुळाशी जाऊन खणली होती धमकीच्या फोनची पाळेमुळे…
केंद्रीय मंत्री गडकरी यांना धमकी देणारा कॉल कर्नाटकातील बेळगावच्या तुरुंगातून कुख्यात गुन्हेगार जयेश कांथा (जयेश पुजारी) याने केला होता. बेकायदेशीरपणे वापरलेल्या मोबाईलद्वारे त्याने हा फोन केल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले असता, त्याचा संपर्क लष्कर ए- तोयबाचा अफसर पाशा सोबत आल्याची माहिती मिळाली होती. एकुरके यांनी त्यालाही ताब्यात घेत चौकशी केली होती. याप्रकरणी एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेसोबत प्रभावती एकुरके यांनी तपास केला. याशिवाय रितेश अहेर यांनीही त्यांना मदत केली. सध्या प्रभावती एकुरके या चंद्रपूरला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
नागपूरमधील या अधिकाऱ्यांचाही गौरव होणार
उत्कृष्ट तपास, विशेष मोहिम राबवत देशाच्या सुरक्षितेसाठी काम करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे दरवर्षी विशेष पदकाने गौरवले जाते. पोलीस, सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पदक दिले जाते. यात केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने शहरातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रेड्डी, प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक विजय ठाकरे तत्कालीन बेलतरोडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रितेश अहेर यांचाही समावेश आहे.

नांदेडमधील ‘ब्लाइंड मर्डर’चा लावला छडा…
ऋषीकेश रेड्डी हे संभाजीनगर एटीएस विभागाचे पोलीस अधीक्षक असताना १० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तपासात मुळचा नांदेड येथील पाकिस्तानस्थित दहशतवादी हरविंदरसिंग ऊर्फ रिंदा आणि हॅपी पासीया यांचा कटातील सहभाग उघड झाला. रेड्डी यांनी अवघ्या २० दिवसांत छडा लावत खलिस्तानी दहशतवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चे (बीकेआय) आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस आणले. या प्रकरणात गोळीबार करणाऱ्यासह १४ पैकी १० आरोपींना अटक करण्यात आली, तर चार आरोपी परदेशात असल्याने त्यांच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले.
