अकोल्यात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत उभारले दोन उड्डाणपूल ;  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण होणार

शहरात कारागृहापासून ते अकोला क्रिकेट क्लब मैदानापर्यंत व दुसरा दक्षता नगर चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला.

शहरात कारागृहापासून ते अकोला क्रिकेट क्लब मैदानापर्यंत व दुसरा दक्षता नगर चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला.

अकोला : शहरातील मध्यवर्ती भागात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपूलावरून २८ मेपासून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात कारागृहापासून ते अकोला क्रिकेट क्लब मैदानापर्यंत व दुसरा दक्षता नगर चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला. २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपुलाला मंजुरी देऊन निधी दिला होता. उड्डाणपुलांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणात वेगाने पूर्ण करण्यात आले. पूर्वी हा उड्डाणपूल अशोक वाटिका ते न्यायालयापर्यंत होता. विविध भागातील वाहतूक लक्षात घेता हा उड्डाणपूल क्रिकेट क्लब मैदानापर्यंतच करण्यात आला. बहुतांश वाहनधारक बाजारपेठ व इतर भागात जाणारे असतात. त्यामुळे त्यांना उड्डाणपुलाचा उपयोग होणार नाही, हे लक्षात घेऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून घेतला. अशोक वाटिका चौक, अमरावती मार्ग व टॉवर चौकात पुलावरून ‘रॅम्प’ मार्ग ठेवण्यात आला, तर बसस्थानक चौकात ‘अंडरपास’ तयार करण्यात आला आहे. खा.संजय धोत्रे यांनी दुरदृष्टी ठेऊन उड्डाणपुलाच्या कामात नागरिकांच्या सोयीसाठी हे बदल करवून घेतल्याचे आ.रणधीर सावरकर यांनी सांगितले. उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाल्याने त्याचे २८ मे रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शहरात सकाळी दाखल झाल्यावर नितीन गडकरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात महामार्गाच्या कामातून तयार करण्यात आलेल्या तलावांची पाहणी करणार आहे. त्यानंतर विद्यापीठातील ठाकरे सभागृहात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम होईल. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर २८ मे रोजी दुपारी २.३० वाजता उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित जाहीर सभेला नितीन गडकरी संबोधित करणार आहेत, अशी माहिती भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली. पत्रकार परिषदेला आ.गोवर्धन शर्मा, आ.प्रकाश भारसाकळे, आ.हरीश पिंपळे, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister nitin gadkari will inaugurate two flyovers in akola zws

Next Story
मित्राच्या मुलीवर युवकाचा बलात्कार
फोटो गॅलरी