scorecardresearch

‘वेतन, पेन्शन, पदोन्नतीसह शिक्षणाकडेही लक्ष द्या’; गडकरींनी टोचले शिक्षक संघटनांचे कान

गडकरी म्हणाले, ज्ञानदान करण्याचे काम हे शिक्षकच करू शकतो, त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे

nitin gadkari
नितीन गडकरी (संग्रहीत छायाचित्र)

शिक्षक संघटनांनी फक्त वेतन, पेन्शन आणि पदोन्नतीसाठीच संघर्ष करू नये तर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल, शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याचाही विचार करावा, अशा शब्दात भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षक व शिक्षक संघटनांचे कान टोचले.

हेही वाचा- प्राजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस ‘अलर्ट मोड’वर, ३ हजार पोलीस बंदोबस्तात

भाजपाने पाठिंबा दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार यांच्या प्रचारार्थ शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. गाणार कट्टर शिक्षक समर्थक व प्रामाणिक आमदार आहेत, शिक्षकांसाठी ते कोणाशीही लढायला तयार होतात. प्रसंगी ते पक्षाचेही ऐकत नाहीत, त्यांचा प्रामाणिकपणा हेच त्यांचे प्रमुख भांडवल आहे, अशा शब्दात आमदार नागो गाणार यांचे कौतुक करतानाच त्यांनी गाणार यांनाच शिक्षकांसोबतच शिक्षण संस्था आणि गुणत्तापूर्ण शिक्षण याकडेही लक्ष देण्याची विनंती केली. केवळ शिक्षण संस्थांविरुद्ध संघर्ष करून चालणार नाही, संस्थाच बंद झाल्या तर शिक्षक उरणार नाही, त्यामुळे शिक्षकांसोबतच शिक्षण संस्थाही जगल्या पाहिजे. शिक्षक व शिक्षकांच्या संघटनांनी विद्यार्थ्यांचा, शिक्षणाच्या उत्तम दर्जाचाही विचार करावा, ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि ज्ञानदान करण्याचे काम हे शिक्षकच करू शकतो, त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. निवडणुकीत जातीय प्रचार करणाऱ्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.

हेही वाचा- अकोला: बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणतो, ‘मला तर देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद’

निवृत अधिकारी गाणारांच्या विरोधात

गाणार यांनी ज्यांच्याविरोधात संघर्ष केला असे शिक्षण खात्यातील काही निवृत्त अधिकारी त्यांच्या विरोधात निवडणुकीत सक्रिय झाले आहे, असा गौप्यस्फो गडकरी यांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 09:27 IST