लोकसत्ता टीम
बुलढाणा : केंद्रातील भाजप आघाडीचे सरकार उत्तम काम करीत आहे. सर्वांची साथ सर्वांचा विकास या पद्धतीने कारभार सुरू आहे. यामुळे हेच सरकार २०२९ मध्येही बाजी मारणार असून मोदी पंतप्रधानपदी चौथ्यांदा विराजमान होतील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. सोबतच बुद्धगया हे बौद्धाच्या ताब्यात देण्याची मागणी पूर्ण झाली नाही तरी मी पदाचा राजीनामा देणार नाही. हा विषय मुळात केंद्राच्या अख्त्यारितील नसून बिहार सरकारशी संबंधित असल्याचेही त्यांनी सांगितले.
आठवले म्हणाले, यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून बौद्धांच्या भावना व मागणी त्यांच्या कानावर टाकणार आहे. आठवले मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यानंतर शासकीय विश्रामगृहात माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपल्या विशिष्ट शैलीत मनमोकळी चर्चा केली.
आठवले म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते काहीही बोलत असले तरी त्याला काही अर्थ नाही. त्यांचे ते कामच आहे. मोदी हे जगातील मोठे नेते आहेत. दिल्लीत काँग्रेस व आप वेगवेगळे लढले, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्यात पटत नाही. महाराष्ट्रात आघाडीने जंग जंग पछाडले पण सत्ता युतीची आली. बिहारमध्येही भाजप आघाडीचेच सरकार येणार असा दावा त्यांनी केला.
मोदी देवाचे अवतार नाहीत
नरेंद्र मोदी हे देशातीलच नव्हे जगातील मोठे नेते आहेत. परंतु, खासदार कंगना राणावत सांगतात त्याप्रमाणे ते देवाचे अवतार मात्र नाहीत, अशा शब्दात आठवले यांनी कंगना राणावतच्या विधानाला छेद दिला.
राणेंची भूमिका वैयक्तिक
नितेश राणे मुस्लिमांबद्धल बोलतात, कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडतात. पण ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. युती सरकारची नाही, असे आठवले यांनी सांगितले. राज्य किंवा महाराष्ट्रातील युती सरकार मुस्लीमविरोधी नाही, असे ते ठासून म्हणाले. वर्ध्यात माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या विषयाची फारशी माहिती नसल्याचे सांगून आठवले यांनी या विषयाला बगल दिली. मनसे आमच्या सोबत असली तरी विधानसभा निवडणुकीत काही फायदा झाला नाही. मराठी भाषेचा अभिमान ठीक पण त्याची सक्ती करणे योग्य नाही. मराठीसाठी दवाब आणणे, मारहाण करणे चुकीचे असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे हे अशक्य असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
शिवसेना संपणार नाही
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्णपणे संपणार नाही, त्यांची ताकद, आमदार खासदार कमी होतील पण उद्धव ठाकरे हे नेतेच राहणार आहेत. मात्र चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येईल आणि आदित्य हे मुख्यमंत्री होतील हे अशक्य आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री मंडळात स्थान, भूमिहीनाना पाच एकर जागा, झुडूपी जंगले भूमिहीनाना कसण्यासाठी द्यावी आदी मागण्या केल्याचे आठवले यावेळी म्हणाले.