यवतमाळ : हल्ली विवाह सोहळे श्रीमंतीचा बडेजाव आणि ’इव्हेंट’ झाले असताना यवतमाळ तालुक्यातील बोरी (अरब) येथे हरिपाठाच्या गजरात साधेपणाने साजऱ्या झालेल्या विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले. मराठी संस्कृतीतील अध्यात्म, भक्ती आणि पारंपरिक मूल्यांचे जतन करत बोरी अरब येथील ‘नामसाधना’ संस्थानात रविवार, ८ जून रोजी हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला.
बोरी (अरब) येथील मुकींदराव गावंडे यांची कन्या भूमिका आणि पंढरीराव ठाकरे (रा. खर्डा) यांचे चिरंजीव अजय यांचा हा विवाह वारकऱ्यांच्या उपस्थितीत, हरिनामाच्या गजरात विठोबाच्या कृपाछायेत, हरिपाठाच्या भक्तीत पार पडला. या विवाहाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, या प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर हरिपाठ मंडळ, हातगाव यांनी पारंपरिक पद्धतीने हरिपाठ सादर केला. टाळ, मृदंग आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. ओव्यांच्या मधूर लयींनी आणि पांडुरंगाच्या स्मरणाने हा विवाहसोहळा एक अध्यात्मिक उत्सव ठरला.
विवाहमंडपात सुरू असलेल्या हरिपाठाच्या ओव्यांमधून नवविवाहित जोडप्यावर प्रेम, आशीर्वाद आणि चैतन्याचा वर्षाव होत होता. उपस्थित वऱ्हाडी आणि पाहुण्यांनी या भक्तिपूर्ण वातावरणाचा मनःपूर्वक आनंद घेतला. प्रत्येक ओवीतून मिळणारे आध्यात्मिक संदेश आणि नामस्मरणाचे सामर्थ्य अनुभवताना हा विवाह क्षणोक्षणी संस्मरणीय ठरत गेला.
या विवाह सोहळ्याचे नियोजन अत्यंत सुबक आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. वऱ्हाड्यांसाठी पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची व्यवस्था होती. ‘नामसाधना’ संस्थेचे कार्य आणि परिसरातील सामाजिक योगदानही पाहुण्यांच्या चर्चेचा विषय ठरला. अजय आणि भूमिका या नवविवाहित जोडप्याने विठोबाच्या आशीर्वादाने आणि उपस्थित भाविकांच्या सदिच्छांनी सहजीवनास प्रारंभ केला. या विवाहाने नाते संबंधांमध्ये भक्ती आणि आध्यात्मिकतेचा समावेश कसा असू शकतो, याचे एक सुंदर उदाहरण उपस्थितांसमोर उभे राहिले.
मराठी संस्कृतीचे जतन करणारा विवाहसोहळा सध्या विवाह सोहळा म्हणजे डीजे, अंधाधूंद नाचगाणे, बेधूंद फोटोशूट आणि पंचपक्वानांची नासाडी असे समीकरण झाले आहे. मुहूर्ताला कोणताच विवाह पार पडत नसल्याने उपस्थितांची गैरसोय आणि वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे विवाह सोहळ्याच्या मुहूर्ताला उपस्थित राहण्याऐवजी दिवसभरात सदिच्छा भेट देवून औपचारिकता पार पाडण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आधुनिकतेच्या लाटेत हरवू पाहणाऱ्या पारंपरिक मूल्यांना पुनरुज्जीवित करणारा बोरी (अरब) येथील हा विवाह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. मराठी संस्कृतीतील भक्तिपंथ, संत परंपरा, आणि विठ्ठलभक्ती यांचे दर्शन या विवाहाच्या निमित्ताने घडले.