नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गृह महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या उन्हाळी परीक्षांमुळे तेथील असुविधांचे पितळ उघडे पडले आहे. विद्यापीठाशी संलग्नित जवळपास दोनशे महाविद्यालये एक ते दोन खोल्यांमध्ये तर काही भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. त्यामुळे अशा महाविद्यालयांची यादी तयार करण्यात आली असून विद्यापीठाकडून त्यांना नोटीस बजावली जाणार आहे.

विद्यापीठाशी संलग्नित खामला परिसरातील श्री राधे महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला परीक्षा संचालकांनी प्रत्यक्ष भेट दिली असता येथील गैरप्रकार उघडकीस आला. येथे चक्क एका खोलीमध्ये महाविद्यालय सुरू होते. यामुळे विद्यापीठाशी संलग्नित अन्य महाविद्यालयांच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपूर विद्यापीठाशी सध्या ५०४ महाविद्यालये संलग्नित आहेत. यातील दोनशे महाविद्यालयांमध्ये प्राथमिक सुविधाच नसल्याची माहिती समोर येत आहे. यातील बहुतांश महाविद्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहेत. काही महाविद्यालयांमध्ये तर कुठल्याच सुविधा नाहीत. अनेक महाविद्यालयांमध्ये एक ते दोनच खोल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि परीक्षा कुठे होतात, असा प्रश्न उपस्थित होतो.. अशा प्रकारच्या दोनशे महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

 ‘एलईसी’च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याआधी विद्यापीठाची स्थानिक चौकशी समिती (एलईसी) तपासणीसाठी जात असते. ही समिती तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेते. त्यानंतर हा अहवाल विद्यापीठाकडे येतो. या अहवालानंतर महाविद्यालयांना एक वा कायमस्वरूपी संलग्नीकरण देण्यात येते. मात्र, अनेक महाविद्यालयांमध्ये सुविधाच नसतात हे उघडकीस आल्यावर या महाविद्यालयांची तपासणी कोणत्या समितीने केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.