अमरावती : विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नतीची संधी देणारी आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मध्यंतरी ही योजना बंद करण्यात आली होती. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, सेवक संयुक्त कृती समिती आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाने यासाठी लढा उभारला होता.
महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात या मागणीसाठी अनेक आंदोलनेही केली गेली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व इतर शासकीय आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षाच्या नियमित सेवेनंतर कालबध्द पदोन्नती योजना लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ही योजना चौथ्या आणि पाचव्या वेतन आयोगावेळी लागू करण्यात आली. परंतु ६ व्या वेतन आयोगावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यात थोडी उणीव ठेवली.
हेही वाचा >>> अमरावती : लग्नसराई ‘एसटी’ ला पावली! १७ कोटींचे भरघोस उत्पन्न
या खात्याच्या १५ फेब्रुवारी २०११ व १६ फेब्रुवारी २०१९ च्या निर्णयानुसार ही योजना राज्यातील कृषीतर विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू केली खरी. तथापि वित्त विभागाची पूर्व मान्यता घेतली नाही. नेमके हेच कारण नमूद करुन शासनाने ही योजना पाच वर्षापूर्वी पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली आणि कर्मचाऱ्यांवर संकट कोसळले. ही योजना पुन्हा लागू व्हावी यासाठी राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवक संयुक्त कृती समितीने २ फेब्रुवारी २०२३ पासून अजय देशमुख यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरु केले होते.