विद्यापीठाकडून परीक्षेचे सुधारित परिपत्रक जाहीर

नागपूर : करोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने महाविद्यालय स्तरावरील परीक्षा घेण्याचा कालावधी वाढवून दिला आहे. त्यानुसार महाविद्यालयांना आता ३१ मे पर्यंत ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

नागपूर विद्यापीठाने प्रथम सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी २०२० च्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर ५ ते २० मेदरम्यान घेण्यास सांगितल्या होत्या. मात्र, करोनापरिस्थितीत अशा परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगत प्राचार्य फोरमने त्यास विरोध दर्शवला होता. अखेर, आता २० मे ऐवजी ३१ मे पर्यंत या परीक्षा घेण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. या सर्व परीक्षा ऑनलाईन घ्याव्या असेही सांगण्यात आले आहे. परीक्षा घेण्याकरिता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची सक्ती करू नये. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणही महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाकडे सादर करावे तसेच परीक्षकांची नेमणूक आपल्या स्तरावर करावी, असे विद्यापीठाने कळवले आहे. याशिवाय, बीई, बीटेक, बीफार्म, तीन आणि पाच वर्षांचे एलएलबी आणि बीएचएमसीटी या परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२९ मे पर्यंत अर्ज भरता येणार

या परिपत्रकानुसार, ९ हिवाळी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीई-१. बीटेक-१, बी.फार्म-१, बीई-३, बीटेक-३, बी.फार्म-३, बीएचएमसीटी-१, एलएलबी-१ (३ वर्षीय), बीएएलएलबी-१ (पाच वर्षीय) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

हिवाळी परीक्षा सुरू असताना, त्या सेमिस्टरच्या पुढच्या अभ्यासक्रमासाठी म्हणजेच उन्हाळी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मे ऐवजी आता २९ मे पर्यंत परीक्षा अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.