नागपूर : दानदात्यांच्या कृपाशीर्वादाने नऊशे कोटी रुपयांच्या जमा ठेवी असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शताब्दी महोत्सव सोहळ्यासाठी संलग्नित महाविद्यालय, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांकडे आर्थिक योगदानासाठी हात पसरले आहेत. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी चक्क पत्र पाठवून संलग्नित महाविद्यालयांनी आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.

नागपूर विद्यापीठ ४ ऑगस्टला गौरवशाली अस्तिवाची ९९ वर्षे पूर्ण करून १००व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यासाठी शताब्दी महोत्सव समिती तयार करण्यात आली असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. मात्र, या महोत्सवासाठी विद्यापीठाने आता देणग्या गोळा करणे सुरू केल्याने याला विरोध होत आहे. कुलगुरूंच्या पत्रानुसार, शिक्षण संस्थांना ५० हजार रुपये योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, शिक्षक व विद्यापीठ अधिकाऱ्यांना एक दिवसाचे सकल वेतन आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना १ हजार तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर विद्यापीठाला डी. लक्ष्मीनारायण व अन्य दानदात्यांनी कोट्यवधींचा निधी आणि संपत्ती दान दिली, तर परीक्षा व अन्य माार्गातूनही विद्यापीठाकडे मोठा निधी जमा होताे. अशा जवळपास ९०० कोटींच्या जमा ठेवी विद्यापीठाकडे आहेत. याशिवाय राज्य शासनाकडूनही मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे. असे असतानाही विद्यापीठाने निधीसाठी महाविद्यालय आणि कर्मचाऱ्यांकडे हात पसरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१०७ कोटींच्या प्रस्तावाचे काय?

नागपूर विद्यापीठाचे २०२२-२३ हे शताब्दी महोत्सवी वर्ष असून यानिमित्त तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार व तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी १०७ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता.