विद्यापीठातील ७५०, महाविद्यालयातील १५०० कर्मचारी सहभागी

नागपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. वारंवार चर्चा व लाक्षणिक आंदोलनानंतरही सरकार लक्ष देत असल्याआ त्यांचा आरोप आहे, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संपात विद्यापीठातील सुमारे ७५० व अनुदानित महाविद्यालयातील सरासरी १५०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे विद्यापीठातील सर्वच विभागात काम  प्रभावित झाले. केवळ कंत्राटी तत्त्वावर नेमलेले कर्मचारी कामावर होते. मात्र, कंत्राटी तत्त्वावरील बहुतांश कर्मचारी हे सेवानिवृत्त विद्यापीठ कर्मचारी असल्याने त्यांचा देखील या संपाला पाठिंबा आहे. यामुळे ९० टक्के काम  झाले नाही, १० टक्के काम अधिकारी व कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन कायम राहणार ठेवण्याचा निर्धार सर्वच कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर शेळके यांनी सांगितले. 

कर्मचाऱ्यांनी वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजनेसह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. संपाला कुलगुरू, कुलसचिव यांनीही पाठिंबा दिला आहे. विद्यापीठातील सर्वच कार्यालयात शुकशुकाट  होता. थंडीचे दिवस असल्याने बहुतांश कर्मचारी उन्हात बसून होते. कार्यालयात केवळ कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडेही कोणतेही काम नसल्याने ते देखील पेंगत असल्याचे चित्र दिसून आले. कामानिमित्त येणारे देखील अधिकाऱ्यांशी भेटून परत जात असल्याचे चित्र विद्यापीठात होते.

संपाचा इशारा दिल्यावर १५ डिसेंबरला मंत्री सावंत यांच्याशी बैठक झाली. १६ ला पुन्हा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी वेळ दिला नाही व बैठक सोडून निघून गेले. यामुळे १७ ला रात्री बेमुदत आंदोलन पुकारण्याचे जाहीर करण्यात आले. जो पर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

अजय देशमुख, अध्यक्ष म.रा.विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी महासंघ

शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे. अनुदानित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना का वगळण्यात आले  यामुळे संपात अनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी देखील सामील झाले आहेत. नागपूर विद्यापीठाशी संलग्न १५५ अनुदानित महाविद्यालयातील १५०० कर्मचारी संपावर आहेत.

संदीप हिवरकर, अध्यक्ष, अनुदानित महाविद्यालय शिक्षकेतर कर्म. संघटना