नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी परीक्षा कुठल्या पद्धतीने होणार हा संभ्रम कायम असून यावर शुक्रवारी निर्णय जाहीर होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता विद्वत परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथे परीक्षेच्या स्वरूपावर चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परीक्षा ऑफलाईनच होणार असून विद्यापीठाने तशी तयारी सुरू केली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली असली तरी परीक्षेच्या स्वरूपाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विद्वत परिषदेला आहे. त्यामुळे येथे चर्चा करूनच विद्यापीठाला तो निर्णय जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने बुधवारी परीक्षेच्या तारखा जाहीर करताना परीक्षा पद्धतीची घोषणा केलेली नाही. मात्र, शुक्रवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीमध्ये यावर निर्णय होणार असून ऑफलाईन परीक्षेच्या सूचना सर्वाना देण्यात आल्याची माहिती आहे. विद्यापीठानेही ऑफलाईन परीक्षेच्या दिशेने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्वत परिषदेसह व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे. यात दीक्षांत सोहोळय़ाच्या तयारीवर चर्चा होणार आहे.