नागपूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक घेत उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापूर्वी ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तोंडघशी पडले आहे.
दरम्यान, उदय सामंत यांच्या बैठकीत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सकारात्मकता दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयात बदल होणार असून उन्हाळी परीक्षा ऑफलाईन होणार आहेत.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन होत असताना नागपूर विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता. याला अभ्यासू विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातूनही विरोध झाला होता.
गुरुवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या लेखी परीक्षा या ऑनलाईन स्वरूपात होतील, असे जाहीर केले होते तसेच ज्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य होणार नाही त्यांना नंतर ऑफलाईन स्वरूपातही परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला होता. सोमवारी सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा आढावा घेतला तसेच सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याची सूचना केली.
याला बैठकीमध्ये उपस्थित सर्व कुलगुरूंनी तयारी दर्शवल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. बैठकीत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनीही उन्हाळी परीक्षा ऑफलाईन घेण्यास संमती दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यापीठ आपल्या ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयात बदल करून पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, परीक्षा विभागाने ऑफलाईन परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र, एमकेसीएलच्या दबावामुळे ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा ऑफलाईन परीक्षा होणार असली तरी परीक्षा विभाग यासाठी सज्ज असल्याची माहिती आहे.
विद्यार्थी संघटनांचा विरोध
राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या विभागांमध्ये ऑनलाईन शिक्षण देण्यात आल्याने परीक्षा ऑफलाईन घेऊ नये, अशी मागणी एनएसयूआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली होती. मात्र, आता पुन्हा ऑफलाईन परीक्षेचा सूर आवळल्याने विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे.
ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी कुलगुरूंना भेटले
अभ्यासू विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षेला विरोध होत आहे. ऑनलाईन परीक्षेत गुणवत्तेला तडा जात असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेत विद्यापीठाची परीक्षा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी केली.