नागपूर : अवकाळी पावसाने अवघा महाराष्ट्र कवेत घेतला आहे. उन्हाळ्यातील काही दिवस वगळले तर अवकाळी पावसाचा मारा सुरुच आहे. अशातच आता हवामान खात्याने शुक्रवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. पाऊस थांबला आहे असे वाटत असतांनाच अधूनमधून अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. आता तर हवामान खात्याने मोसमी पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. तरीही अवकाळी पाऊस मात्र सुरूच आहे.

या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे. धानपिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार आज शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा…एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा

विदर्भात देखील हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भाच्या काही भागात देखील गारपीट होण्याची शक्यता आहे. फक्त पाऊसच नाही तर पावसासोबत वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. ताशी ४० ते ५० च्या वेगाने वारे वाहतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

पावसासोबतच राज्याला वादळाचा देखील तडाखा बसू शकतो. दरम्यान, काल गुरुवारी उपराजधानीला दुपारी चार नंतर वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. ताशी ३० ते ४० च्या वेगाने वारे वाहत होते. सुमारे तासभर झालेल्या पावसाने शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी दिशादर्शक फलके पडली. आज देखील सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.

हेही वाचा…बियाणे उत्पादनात घट? शेतकरी चिंतेत, मागणी अधिक पुरवठा कमी

या जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट”

हवामान खात्याकडून आज महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा, पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा…नक्षत्र भ्रमणानुसार हवामान अंदाज, तज्ज्ञ काय सांगतात ?

या जिल्ह्यांना “येलो अलर्ट”

हवामान खात्याकडून जालना, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, यवतमाळ, सोलापूर, सांगली यासह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.