बुलढाणा : मागील वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, महापूर आणि  अधूनमधून झालेल्या  ढगफुटी सदृश्य  पावसाने  खरीप हंगाम उध्वस्त झाला. यामुळे  लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षा  रब्बी हंगामावर  केंद्रित झाल्या असताना निसर्गाच्या लहरीपणाचा  फटका रब्बीला देखील बसला आहे.  दोन तालुक्यात  वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजारो  हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहे. दुसरीकडे मागील आठवढ्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणाचाही रब्बी  पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.

यंदाच्या खरीप हंगामात  ७. २९ लाख हेक्टरवर पेरा करण्यात आला होता. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन चा सव्वाचार लाख तर कपाशीची सुमारे १.८० लाख हेक्टरवर पेरा करण्यात आला होता. मात्र  वरुणराजाच्या  तांडवामुळे  खरीप पिकांची अतोनात हानी झाली. एकरी उत्पादन घटलेच पण हाती आलेल्या  पिकांना मातीमोल भाव मिळाला. यामुळे खरीपाची  जिल्ह्यातील १४१० गावांची   अंतिम पैसेवारी ५० पैश्यापेक्षा कमी आली.

यामुळे कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याच्या अपेक्षा रब्बी वर केंद्रित झाल्या. पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने  यंदा  विक्रमी इतक्या ३. ७९ हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, तूर, मका, ज्वारी या पिकांचा पेरा करण्यात आला. ही पिके बहरली असताना निसर्गाने पुन्हा लहरीपणा दाखविला. मागील आठ, दहा दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण  असून  थंडीचा तडाखा वाढला आहे.  सकाळी असलेल्या धुक्यामुळे  मुख्य पिकावरील  रोगराई वाढली आहे. प्रामुख्याने गव्हाला धुक्याचा जास्त फटका बसला असून हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रकोप वाढला आहे. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या  किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे या मुख्य पिकांची मोठी हानी होण्याची दाट शक्यता आहे. जादा थंडीचा  फटका फळबागाना बसत आहे.

वादळी फटका दरम्यान २८ व २९ जानेवारीला जळगाव व संग्रामपूर तालुक्याला वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आहे. चक्रीवादळ सदृश्य वादळाने ३६ गावात थैमान घातले. तब्बल ५ हजार ३७७ हेक्टर वरील गहू, मका, तूर, हरभरा यासह  कांदा, संत्र्याचे मोठे नुकसान झाले.  जळगाव मधील १२ तर संग्रामपूर मधील २४ गावात  ही हानी झाल्याचा प्राथमिक अहवाल  कृषी विभागाने  जिल्हा प्रशासनाला आज  सादर केला आहे. यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा रब्बी ला देखील फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.