अकोला : एका सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानदाराने आपल्या साथीदारांसह अश्लील चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देऊन विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. धर्मांतर करण्यासाठीही त्या पीडित महिलेवर आरोपींनी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणातील नराधम आरोपीच्या दुकानावर अकोला महापालिकेच्या पथकाने बुधवारी बुलडोझर चालवून ते नष्ट केले. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आरोपीच्या अतिक्रमणाविरोधात ही कारवाई केली.
शहरातील गांधी मार्गावर ‘परी बिंदी घर’ या नावाने दुकान होते. या दुकानाच्या संचालकाने ग्राहक असलेल्या एका विवाहित महिलेच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वारंवार संपर्क साधला. दुकानात नवीन माल आणल्याचे कारण करून त्याने विवाहित महिलेला दुकानात बोलावून घेतले. दरम्यान, त्याने आपल्या साथीदारांसह महिलेवर बळजबरी अत्याचार केला. त्याची चित्रफित तयार केली. ती चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन चार नराधमांनी विवाहित महिलेवर २०२४ ते २०२६ दरम्यान वारंवार अत्याचार केला. त्यानंतर ती चित्रफित डिलीट करण्यासाठी विवाहित महिलेवर धर्मांतराचा दबाव देखील टाकला. अखेर पीडित महिलेने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
शहर कोतवाली पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी मोहम्मद आसिफ उर्फ बाबू मोहम्मद सलीम तेली, इमरान खान यासिन खान, चंदू राजू वानखडे आणि रहेमान खान उर्फ मोहम्मद मुस्तफा मोहम्मद सलीम तेली यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तपासाची सूत्रे वेगाने फिरवत गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयापुढे हजर केले. त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित दोन आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, गांधी मार्गावरील शहर कोतवालीच्या मागे ‘परी बिंदी घर’ व इतर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. या अवैध दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पक्षकाने बुधवारी कारवाई केली. बुलडोझर चालवून अतिक्रमणाचा सफाया केला. महापालिका प्रशासनाने ही कारवाई अवैध अतिक्रमणाविरोधात असल्याचे स्पष्ट केले. महिलेवर अत्याचार सारखे गंभीर प्रकरण दाखल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन आरोपीचे अतिक्रमण काढले. आरोपी विरोधात केलेल्या या कठोर कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

