अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२७ च्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी राज्यस्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून यासाठी नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रवेश परीक्षा केव्हा?

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जून २०२६ ही राहील, तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी १९ जून २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या प्रवेशासाठीची राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दिनांक १९ जुलै २०२६ रोजी रविवारी, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल.

तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाचे

ही परीक्षा नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची परीक्षा आहे. यामध्ये उत्तीर्ण झाल्यास उमेदवारांना शासनाकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आर्थिक आणि शैक्षणिक मदत केली जाते. ही परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत आयोजित केली जाते.

अर्ज करण्याचे आवाहन

या परीक्षेची सविस्तर जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची संपूर्ण माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व महत्त्वाच्या सूचना http://www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना-

  • विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरवले जाणार असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल.
  • सामायिक प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे.
  • प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ‘एसआयएसी’ च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.
  • सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.