नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही ओबीसी आरक्षणाच्या क्रिमीलेअर निकषांमुळे अनेक उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही केंद्र सरकारने स्पष्टीकरण मागितल्याने २०२५ च्या तुकडीतील ९५८ उमेदवारांचे सेवा वाटप आणि प्रशिक्षण रखडले आहे. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रत्यक्ष सेवेत रुजू होण्याची प्रतीक्षा या उमेदवारांना करावी लागत आहे.

आठ वर्षांचा न्यायालयीन लढा; वेतनाच्या निकषाला आव्हान

सार्वजनिक उपक्रम, बँका आणि खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत पालकांचे वेतन निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास त्यांच्या मुलांना क्रीमीलेअर ठरविले जात होते. केवळ वेतनाच्या आधारे क्रीमीलेअर ठरविणे अन्यायकारक असल्याचा दावा उमेदवारांनी केला. पालकांच्या पदाचा दर्जा आणि सरकारी पदाशी समकक्षता विचारात घेण्याची मागणी करीत सुमारे आठ वर्षे न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर ११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रोहित नाथन प्रकरणात उमेदवारांच्या बाजूने निकाल दिला.

सहा महिन्यांत पुनर्विचाराचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकाकर्ते आणि हस्तक्षेपकर्त्या उमेदवारांच्या दाव्यांचा सहा महिन्यांत पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. पात्र उमेदवारांना सामावून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त (सुपरन्यूमरेरी) पदे निर्माण करण्यासही सांगितले. ही मुदत ११ सप्टेंबर २०२६ रोजी संपली.

केंद्र सरकारचा पूर्वलक्षी अंमलबजावणीला आक्षेप

निकाल पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्यास २०१२ पासूनच्या नागरी सेवा परीक्षांतील नियुक्त्या, सेवा वाटप, ज्येष्ठता आणि पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यामुळे २४ ऑगस्ट रोजी सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरणासाठी अर्ज केला. तसेच पालकांच्या पदांची सरकारी पदांशी समकक्षता निश्चित करण्यासाठी दोन वर्षांची मुदत मागितली. निकालाची अंमलबजावणी भविष्यातील भरती प्रक्रियांपासून करावी, अशीही सरकारची मागणी आहे.

९५८ उमेदवारांचे प्रशिक्षण रखडले

यूपीएससी २०२५ चा अंतिम निकाल ६ मार्चला जाहीर झाला. मात्र, सेवा वाटपाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतील प्रशिक्षण सुरू होऊ शकलेले नाही. २४ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला. अंतिम निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. केंद्र सरकारच्या स्पष्टीकरण अर्जावरील निर्णय प्रलंबित असल्याने सेवा वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ९५८ उमेदवारांचे प्रशिक्षण आणि नियुक्तीचा प्रश्न अद्याप अनिर्णित आहे.

‘केंद्र सरकारची भूमिका ओबीसीविरोधी’; उमेश कोर्राम यांची टीका

ओबीसी क्रिमीलेअर प्रकरणी आठ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्चला उमेदवारांना दिलासा दिला. मात्र, निकालाची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र सरकार स्पष्टीकरणाच्या नावाखाली विलंब करीत असल्याचा आरोप सकल ओबीसी महामोर्चाचे संयोजक उमेश कोर्राम यांनी केला. ही भूमिका ओबीसीविरोधी असून, ९५८ उमेदवारांचे रखडलेले सेवा वाटप आणि प्रशिक्षण तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.