नागपूर : पूर्व नागपुरातील भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या निवासस्थानी मंगळवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारामागचा उद्देश अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे पोलीसही कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.
नगरसेवक मोटघरे यांनी काही महिन्यांयापूर्वी खंडणीची मागणी करणाऱ्या एकाला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. शिवाय त्यांचा व्यवसायावरूनही काही जणांशी वाद होता. त्यातूनच ही घटना घडली असेल का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतरच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेत तपास प्रक्रियेला वेग दिला.
पोलीस आयुक्तांनी घेतली कुटुंबीयांची भेट
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कॉँग्रस नगरसेवक मोटघरे यांच्या निवासस्थानी भेट देत लवकरच गुन्हेगारांना जेरबंद करू अशी हमी कुटुंबियांना दिली. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती घेतली. आयुक्तांच्या भेटीदरम्यान गुन्हे शाखेचे अधिकारी आणि तपास पथकातील सदस्य उपस्थित होते. या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
हल्लेखोर मोकाट
नगरसेवक मोटघरे यांच्या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची ही घटना घडून अनेक तास उलटले आहेत. मात्र मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तपासादरम्यान पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेता येईल, अशी आशा अधिकाऱ्यांना आहे.
गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना सूचना
गोळीबाराच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत आहेत. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहे. याव्यतिरिक्त, घटनेपूर्वी आणि नंतर संशयास्पद हालचालींमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींबाबतही माहिती गोळा केली जात आहे.
खंडणीच्या दिशेनेही तपासाची चक्रे
नगरसेवकाच्या घरावर झालेल्या गोळीबारामागे राजकीय वैमनस्य असल्याची चर्चाही सुरू झाली आहे, मात्र पोलिसांनी अद्याप कोणत्याही शक्यतेची पुष्टी केलेली नाही किंवा ती फेटाळूनही लावलेली नाही. पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर गुन्हे शाखा सक्रीय झाली आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख पटवणे आणि त्यांना अटक करणे हे पोलिसांसमोरील सध्याचे मुख्य आव्हान आहे.
नगरसेवकाने केली सुरक्षेची मागणी
दरम्यान यापूर्वीही आपल्याला खंडणीची मागणी झाली होती. शिवाय हा हल्ला राजकीय वैमनस्य देखील असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी मला व माझ्या परिवाराला सुरक्षा द्यावी अशी मागणी नगरसेवक मोटघरे यांनी पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्याकडे केली आहे.
