वर्धा : व्याघ्र सफारी अलीकडे चांगलेच लोकप्रिय होत असलेले पर्यटन ठरू लागले आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक मान्यवर त्यामुळे विदर्भातील जंगलाचा धांडोळा घेऊ लागले आहे. काहींना तर जणू चटकच लागली आणि दरवर्षी त्यांची भ्रमंती ठरलेलीच. आता सध्या सर्वात गाजत असलेला क्रिकेटपटू म्हणजे वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Surywanshi ).
राजस्थान रॉयलचे ठाणे
वर्धा जिल्ह्यातील अमरावती – नागपूर मार्गावर तळेगाव येथे राजस्थान रॉयल ( Rajasthan Royal ) च्या संघाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी संघाचे खेळाडू येत असतात. त्यांनी गतवेळी लगतच असलेल्या बोर व्याघ्र ( BTR ) प्रकल्पच्या राहटी गेटची माहिती मिळाली होती. आमदार सुमित वानखेडे यांच्या सूचनेने वन परीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी त्यांची भेट घेत निमंत्रण दिले होते. त्यावेळी निश्चित भेट देवू, अशी हमी सूर्यवंशीने दिली होती.
अखेर भेट झालीच
काल शुक्रवारी अखेर हे स्टार जंगलात धडकलेच. वैभव सूर्यवंशी आणि सोबत शुभम दुबे, रवी सिंग आणि सुशांत मिश्रा हे अन्य क्रिकेटपटू होते. सोबत व्यवस्थापक रोमी व अन्य होते. वन अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि सूरू झाली एक रंजक सफारी. असा या व्याघ्र सफारीचा या क्रिकेटपटू टोळीचा पहिलाच अनुभव. म्हणुन सगळे रोमांचित.
यांनी केले जंगलात स्वागत
क्रिकेटपटू प्रामुख्याने उत्सुक होते ते वाघ बघण्यासाठी. त्यामुळे सफारी जीप्सी फिरफीर फिरू लागली. प्रथम स्वागत केले ते एका धिप्पाड बिबट्याने. नंतर टूनटून उड्या मारत अस्वल आले. सांबर, चितळ, मोर तर झुंडीने आले. मनसोक्त फोटोबाजी झाली. पण तरीही हुरहूर. कारण वाघ दिसता दिसेना. तो पाहणार आणि मगच जाणार, असा निश्चय. तर स्टार वैभव हा वाघ बघण्याचा हट्ट धरून बसलेला.
स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध बोर व्याघ्र प्रकल्पात (राहटी गेट) आपल्या सहकाऱ्यांसह जंगल सफारीचा आनंद घेतला. सफारीदरम्यान बिबट्या, अस्वल आणि इतर वन्यजीव दिसले, परंतु वाघ पाहण्यासाठी वैभवने धरलेला हट्ट आणि वन अधिकाऱ्यांची झालेली धांदल सध्या चर्चेचा… pic.twitter.com/j0dI3DlkOR
— LoksattaLive (@LoksattaLive) August 8, 2026
वन अधिकारी पडले पेचात
या पोरसवदा दिसणाऱ्या वैभवचा हट्ट कसा पुरविणार, असा पेच अधिकाऱ्यांना पडला. सायंकाळ होत आलेली. सफारीचे नियम कठोर. तर देशाचा लाडका वैभव त्याहून मोठा ठरलेला. रात्र झाली तरी चालेल, पण वाघ बघूच. त्याची भावना समजून घेत अधिकाऱ्यांनी सूत्र हाती घेतले. तुम्ही स्टार मंडळी आहात. तुमच्या जीवाला धोका झाल्यास आम्हास घरी जावे लागेल. नियम सोडा पण स्वतःस जपणे महत्वाचे. पुढील वेळी सकाळीच या, नक्की वाघ दिसेल. राहटी पावसाळ्यात पण सूरू असते. ईथे विराट हा उमदा व भव्य शरीरयष्टीचा वाघ आहे. तो पण दिसेल. अशी मनधरणी झाली आणि वैभवचा हट्ट दूर झाला.
निसर्गाच्या प्रेमात खेळाडू
वैभवची गाडी परतीच्या प्रवासास निघाली आणि १५ मिनिटातच वाघ या जागी धडकला. पण त्याचे दर्शन होणे नव्हतेच. मात्र भर पावसाळ्यात येथील गर्द वनराई, तुडुंब भरलेले तळे, पिसारा फुललेला मोर, पक्षी किलबिलाट असा निसर्ग पाहून हे स्टार आनंदित झाले होते. आता इकडे आलो की राहटी भेट पक्कीच, असा आनंद त्यांनी व्यक्त केल्याचे रुपेश खेडकर सांगतात. वैभव यांस फोटोग्राफर आकाश मुंगले, क्षेत्र सहाय्यक वसंत खेलकर, बिटगार्ड शारिक सिद्दीकी व विष्णू कदम, जिप्सी चालक राजू घोडे व मनोज लाखे यांनी साथ दिली.
