करोनाने गांजलेल्यांना ‘निश्चयी’ आधार…

‘‘स्थापनेनंतर विविध क्षेत्रांत काम करणारी माणसे संस्थेशी जोडली गेली आहेत.

|| राम भाकरे
नागपूरमधील संस्थेचे औषधापासून-अन्नदानापर्यंत मोलाचे कार्य

नागपूर : करोना साथीत वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यापासून साथ आणि टाळेबंदीचा फटका बसलेल्या गरजू व्यक्तींचे आयुष्य सावरण्यापर्यंतच्या विविध कामांसाठी नागपूरमधील ‘निश्चय फाऊंडेशन’ने युवा कार्यकर्त्यांची फळी बांधून सातत्याने काम केले.

संस्थेचे पदाधिकारी अ‍ॅड. पवन ढिमोले म्हणाले, ‘‘स्थापनेनंतर विविध क्षेत्रांत काम करणारी माणसे संस्थेशी जोडली गेली आहेत. करोनाची दुसरी लाट आली, त्यावेळी रुग्णालयात खाटा मिळत नव्हत्या. प्राणवायूची कमतरता होती, औषधे मिळत नव्हती, गोरगरिबांना दोनवेळच्या जेवणाचीही सोय नव्हती, अशा परिस्थितीत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम केले.’’

वाहतूक पोलीस करोनाच्या काळात दिवसरात्र काम करीत होते. त्यांच्यासाठी संस्थेकडून कोतवाली, तहसील, अजनी, गणेशपेठ, सक्करदरा, पाचपावली या पोलीस ठाण्यात जाऊन सॅनिटायझर, मुखपट्टीचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या शंभरहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. करोनामुळे निधन झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांना मदत व्हावी म्हणून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एका झोपडपट्टीतील पाच घरे दत्तक घेतली. संस्थेद्वारा जवळपास पाचशे ते सहाशे लिटर सॅनिटायझरचे वाटप पोलीस, वाहतूक पोलीस, सफाई कर्मचारी व अन्य करोनायोद्ध्यांना करण्यात आले. ढिमोले यांनी सांगितले, की करोनाच्या काळात शहरातील प्रदूषण कमी व्हावे, या दृष्टीनेही संस्थेने प्रयत्न केले. शहरातील गांधीसागर तलावाची स्थिती चांगली नव्हती. मोठ्या प्रमणात कचरा साचलेला होता. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस संस्थेचे कार्यकर्ते तलावाची स्वच्छता करीत होते. यात डॉक्टर, अभियंते, वकील, व्यापारी, उद्योगपती, पत्रकार व इतरांचाही समावेश होता. कोणाकडे पैशांसाठी हात न पसरता संस्थेचे २०० हून अधिक कार्यकर्ते या कार्यात जमेल तशी मदत करत होते.

करोना काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या गावात किंवा राज्यात जात असलेल्या प्रवासी व कामगारांसाठी रेल्वेस्थानकावर भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली.

जीव वाचवण्यासाठी धडपड…

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांना फिरावे लागत असताना संस्थेने त्याची व्यवस्था करून दिली. काही खासगी प्राणवायू निर्मिती करणाऱ्यांशी संपर्क साधून लोकांच्या घरी नि:शुल्क प्राणवायू पोहोचवला. त्यातून जवळपास ५० पेक्षा अधिक करोनाबाधितांचे जीव वाचू शकले.

  वेश्या वस्तीतही मदतीचा सेतू…

शहरातील ‘गंगा जमुना’ भागातील अनेक कुटुंबांची अवस्था फारच वाईट होती. करोनाच्या काळात त्यांना कुठलीही मदत मिळत नव्हती. त्यामुळे या भागात दोन महिने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. पाचशेहून अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला. हासुद्धा समाजातील एक घटक आहे हे लक्षात घेऊन येथील लहान मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी अभ्यासाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. त्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणीही संस्थेकडून करण्यात आली.

घरी जाऊन उपचार…

साथीच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी मार्च-एप्रिलमध्ये काही रुग्णांना खासगी रुग्णालयात खाटा मिळत नव्हत्या, अनेकांना घरीच उपचार करण्याची वेळ आली होती. अशा वेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांची व्यवस्था केली आणि लोकांच्या घरी जाऊन उपचार केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Valuable work organization in nagpur from medicine to food donation akp