नागपूर: ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या निवासस्थानापुढे प्रकाश आंबेडकर प्रणित वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली व डॉ.मनोहर यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मंगळवारी गणेश विसर्जनाचा दिवस असल्याने सर्वत्र त्याचीच धावपळ सुरू असताना सकाळी दहाच्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसेवा नगर, भामटी रोड येथील ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर यांच्या निवासस्थानी पोलीस तैनात करण्यात आल्याची बातमी येऊन धडकली. संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. एक प्रकारे पोलीस छावणीचे स्वरूप परिसराला आले होते. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने डॉ. मनोहर यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, असे नंतर स्पष्ट झाले.
हेही वाचा >>>“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…
वंचितांच्या आंदोलनाला प्रतापनगर पोलिसांनी परवानगी नाकारली तरी काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसानी त्याला मज्जाव केला. त्यानंतर कार्यकर्ते संभाजीरोडवर निदर्शने करून लागले. पोलिसांनी तेथे पोहचत आंदोलन करणा-या २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, असे प्रतापनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश सांगाडे यांनी सांगितले. आरक्षणाबाबत डॉ. मनोहर यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले जाते.
आंदोलनाचा दक्षिणायनतर्फे निषेध
डॉ. यशवंत मनोहर हे महाराष्ट्रातील दक्षिणायन अभियानाचे एक मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहेत. गेली दहा वर्षे देशातील आणि राज्यातील हुकूमशाही व्यवस्थेविरुद्ध त्यांनी जाहीर भूमिका घेतली आहे. अशा कठीण काळात अनेक साहित्यिक भूमिका घेत नाहीत. लोकशाही आणि संविधान रक्षण यावर केवळ निष्ठा असून चालत नाही. लोकशाही आणि संविधान धोक्यात येत असते तेंव्हा पुढे यावे लागते. डॉ. यशवंत मनोहर यांनी हे सातत्याने केले आहे. त्यांच्या घरासमोरील आंदोलनाचा दक्षिणायनतर्फे निषेध करण्यात आला आहे.