अकोला : दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार प्रकरणाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. वंचितच्या या बंदला अकोला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहर कोतवाली भागात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ उडाला होता. पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बंदला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद

दिल्ली येथील लाठीमार प्रकरणाचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात बंदला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळाला. वंचित आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी करण्यासाठी आज सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढून वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात आले. अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेऊन आपली दुकाने बंद ठेवली.

शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

या पार्श्वभूमीवर शहरातील काही खासगी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता बंदमध्ये सहभाग घेतला. या संदर्भात पालकांना अगोदरच संदेश पाठविण्यात आले होते. अनुदानित व इतर शाळा सुरू होत्या. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ‘वंचित’च्या महाराष्ट्र बंदला अकोला जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. यामध्ये युवा समिती, महाराष्ट्र शेतकरी संघटना, कुणबी समाज मंडळ, जिल्हा बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजुर असोसिएशन, छावा, कुंभार समाज विकास परिषद, संभाजी ब्रिगेड, डाटा आदींसह विविध संघटनांचा सहभाग होता.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने वाद

शहरातून आंदोलकांनी फेरी काढली असतांना शहर कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेले आंदोलक व पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. यावेळी चांगलाच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी वंचित आणि पाठिंबा देणाऱ्या संघटना, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती होती. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या बंददरम्यान पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रकार दडपशाही असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा तालुक्यात बंदला प्रतिसाद दिसून आला.