अकोला : दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार प्रकरणाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. वंचितच्या या बंदला अकोला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. काही खासगी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढत बंदचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.

दिल्ली येथील घटनेचे तीव्र पडसाद

नीट पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नैतिक जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदान येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करण्यात आला. यामध्ये असंख्य विद्यार्थी जखमी झाले. दिल्ली येथील घटनेचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात बंदला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळत आहे.

फेरी काढून बंदचे आवाहन

वंचित आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी करण्यासाठी आज सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढून वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात येत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेऊन आपली दुकाने बंद ठेवली. या पार्श्वभूमीवर शहरातील काही खासगी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता बंदमध्ये सहभाग घेतला. या संदर्भात पालकांना अगोदरच संदेश पाठविण्यात आले होते. अनुदानित व इतर शाळा सुरू आहेत.

शिवसेना ठाकरे गटासह विविध संघटनांचा बंदला पाठिंबा

‘वंचित’च्या महाराष्ट्र बंदला अकोला जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. यामध्ये युवा समिती, महाराष्ट्र शेतकरी संघटना, कुणबी समाज मंडळ, जिल्हा बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजुर असोसिएशन, छावा, कुंभार समाज विकास परिषद, संभाजी ब्रिगेड, डाटा आदींसह विविध संघटनांचा सहभाग आहे.