नागपूर : अजनी रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढत असताना ६७ वर्षीय महिलेच्या पिशवीतील तब्बल २१ लाख रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम महिलांच्या टोळीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत टोळीने ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही तपासातून स्पष्ट झाले असून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.
गर्दीचा फायदा घेत महिलेला घेरले
पुणे येथील अंजली मुधोळकर या कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपुरात आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसने पुण्याकडे रवाना होत होत्या. अजनी रेल्वे स्थानकावर गाडीत चढण्याच्या तयारीत असताना काही महिलांनी त्यांना घेरल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या महिलांनी मुद्दाम गोंधळाचे वातावरण निर्माण करून त्यांचे लक्ष विचलित केले. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतील मौल्यवान वस्तू असलेली पर्स लंपास करण्यात आली.
दागिने, रोकड आणि कागदपत्रे चोरीला
चोरी झालेल्या पर्समध्ये सुमारे २८ हजार रुपये रोख, सोन्याची मंगळसूत्र, नेकलेस, साखळी, टॉप्स, हिऱ्याचे पेंडंट तसेच इतर सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. या सर्व ऐवजाची किंमत सुमारे २१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाडी स्थानक सोडल्यानंतर काही वेळातच मुधोळकर यांच्या लक्षात पर्स गायब झाल्याचे आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
सीसीटीव्हीत संशयित महिलांचे चित्रण
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) यांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानकावरील तसेच रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काही संशयित महिला दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीची घटना रेल्वे डब्यात नव्हे तर प्लॅटफॉर्मवर गाडीत चढताना घडल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.
सराईत चोरट्यांवर पोलिसांचे लक्ष
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान रेल्वे परिसरात सक्रिय असलेल्या काही सराईत महिला चोरट्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज, स्थानकावरील हालचाली आणि संशयितांच्या गुन्हेगारी नोंदींचा आधार घेत तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
