नागपूर : नागपूर-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका टीटीईची अचानक प्रकृती बिघडली.  मात्र, त्याच गाडीत प्रवास करणारे नागपूरचे डॉ. अनुप शर्मा यांनी तातडीने उपचार करून टीटीईची प्रकृती स्थिर केली आणि संभाव्य अनर्थ टळला.

अचानक प्रकृती बिघडल्याने धावपळ

नागपूरहून इंदूरकडे जाणाऱ्या २०९१२ नागपूर-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बुधवारी जुलै) ही घटना घडली. पश्चिम मध्य रेल्वेच्या रतलाम विभागात कार्यरत असलेले टीटीई महेश त्यागी हे सी-९ डब्यात कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना प्रचंड घाम येणे, छातीत वेदना, अंगदुखी आणि चक्कर येणे अशी लक्षणे जाणवू लागली. त्या वेळी गाडी पांढुर्णा आणि बैतूल स्थानकांदरम्यान धावत होती. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकारी टीटीईंनी तत्काळ गाडीत डॉक्टरांचा शोध सुरू केला.

डॉक्टरांनी दिले तातडीचे उपचार

सी-३ डब्यात प्रवास करणारे नागपूरचे डॉक्टर अनुप शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सी-९ डब्याकडे धाव घेतली. त्यांनी महेश त्यागी यांची तपासणी करून प्राथमिक उपचार सुरू केले. त्यांना ॲक्युप्रेशरद्वारे तातडीने उपचार देण्यात आले. तसेच आवश्यक औषधांची चिठ्ठीही लिहून दिली. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे प्रवाशांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली.

बैतूल स्थानकावर औषधांची व्यवस्था

दरम्यान, गाडी बैतूल स्थानकावर पोहोचताच डॉक्टरांनी सुचविलेली औषधे तातडीने उपलब्ध करून ती गाडीत आणण्यात आली. महेश त्यागी यांना ती औषधे देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. डॉक्टर शर्मा यांनी उपचारानंतरही त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले. स्वतः इंदूरपर्यंतचा प्रवास असल्याने त्यांनी रात्री सुमारे ९.३० वाजताही पुन्हा त्यांची तपासणी केली. त्या वेळी त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्याचे आढळून आले.

प्रवाशांकडून डॉक्टरांचे कौतुक

वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना सहप्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. टीटीई महेश त्यागी यांनीही डॉ. अनुप शर्मा यांचे मनापासून आभार मानले. गाडीत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवांचा अभाव असतानाही एका सजग प्रवाशाने दाखविलेली तत्परता आणि वैद्यकीय कौशल्य यामुळे एका रेल्वे कर्मचाऱ्याचा जीव वाचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत सामान्य नागरिक आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, डॉ. शर्मा यांच्या संवेदनशीलतेचे आणि सेवाभावाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.