नागपूर : भारतीय रेल्वेच्या ‘वंदे भारत स्लीपर’ प्रकल्पातील फर्स्ट एसी डब्याच्या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ए डिझाइन अवॉर्ड २०२६’ जाहीर झाला आहे. ‘किनेट’ या कंपनीने विकसित केलेल्या या संकल्पनेला ‘मोबिलिटी अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्टेशन डिझाइन’ विभागात कांस्य पुरस्कार मिळाला. प्रवाशांच्या सोयी, कार्यक्षम रचना आणि आकर्षक अंतर्गत सजावटीमुळे आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.

२०२५ मध्ये संकल्पना सादर

या पुरस्कारामुळे रेल्वे डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील भारताची वाढती क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. ‘वंदे भारत स्लीपर’ प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेतील प्रवासाचा दर्जा, आरामदायी सुविधा आणि प्रवासी अनुभव यांना नवे परिमाण मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या डब्याची संकल्पना प्रथम २०२५ मधील ‘इंटरनॅशनल रेल्वे इक्विपमेंट एक्झिबिशन’मध्ये सादर करण्यात आली होती. भविष्यातील उत्पादन मॉडेल्सशी ही संकल्पना मोठ्या प्रमाणात सुसंगत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

आधुनिक सुविधांचा समावेश

‘वंदे भारत स्लीपर’ प्रकल्पाचे मुख्य औद्योगिक डिझायनर एव्हगेनी मासलोव्ह यांनी सांगितले की, “आमचा उद्देश केवळ आरामदायी अंतर्गत रचना तयार करण्यापुरता मर्यादित नव्हता. भारतीय रेल्वेची आधुनिक, प्रवाशाभिमुख आणि भावनिक नाते जपणारी नवी प्रतिमा घडविण्याचा प्रयत्न आम्ही केला.” या फर्स्ट एसी डब्याच्या रचनेत प्रशस्त जागा, प्रायव्हसी आणि आधुनिक सुविधा यांचा समतोल साधण्यात आला आहे. वरच्या बर्थसाठी सोयीस्कर जिने, वैयक्तिक प्रकाशयोजना, यूएसबी चार्जिंग सुविधा आणि लहान साठवण व्यवस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय पारंपरिक ब्लॉक प्रिंट कलेपासून प्रेरित सजावटीचे घटकही अंतर्गत रचनेत वापरण्यात आले आहेत.

सुमारे दोन हजार डब्यांची निर्मिती

‘ए डिझाइन अवॉर्ड अ‍ॅण्ड कॉम्पिटिशन’ ही जगातील मोठ्या डिझाइन स्पर्धांपैकी एक मानली जाते. २०२६-२७ च्या स्पर्धेत ३१२ परीक्षक सहभागी झाले होते. जगभरातील डिझायनर, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी या प्रक्रियेत सहभागी होते. ‘किनेट रेल्वे सोल्यूशन्स’ ही कंपनी १,९२० ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांच्या निर्मिती आणि देखभालीसाठी स्थापन करण्यात आली आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) आणि भारतीय रेल्वेच्या भागीदारीत कंपनी लातूर येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारत असून, हैदराबाद येथे अभियांत्रिकी केंद्र कार्यरत आहे. जोधपूर येथे देखभाल डेपोचे काम सुरू असून, दिल्ली आणि बेंगळुरू येथेही सुविधा उभारण्याची योजना आहे.