नागपूर: भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी वंदे भारत स्लीपर प्रकल्पाने महाराष्ट्राततील लातूरमध्ये वेग घेतला आहे. अत्याधुनिक स्लीपर कोचच्या निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या कीनेट रेल्वे सोल्युशन्सच्या प्रकल्पात दोन प्रोटोटाइप ट्रेनसेटची जुळणी सुरू झाली असून, चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मालिकात्मक उत्पादनाला प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

दोन प्रोटोटाइपची जुळणी सुरू

लातूरमधील उत्पादन केंद्रात दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटच्या प्रोटोटाइपची जुळणी सुरू आहे. निर्मितीनंतर त्यांची विविध तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या घेतल्या जातील. ग्राहकांकडून स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित उत्पादन सुरू होईल. मार्च २०२३ मध्ये झालेल्या ६.५ अब्ज डॉलरच्या करारानुसार १२० वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट, म्हणजेच १,९२० डब्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासोबत ३५ वर्षांच्या देखभालीची जबाबदारीही कंपनीकडे आहे.

ताशी १६० किलोमीटर वेगाची क्षमता

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपरची रचना करण्यात आली आहे. या ट्रेनची ताशी १६० किलोमीटरपर्यंत वेगाने धावण्याची क्षमता आहे. वितरित कर्षण प्रणाली, पुनरुत्पादक ब्रेकिंग आणि ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रवाशांच्या आरामासाठी सेन्सरवर आधारित दरवाजे, ध्वनिरोधक व्यवस्था आणि सीलबंद गँगवेची (दोन रेल्वे डब्यांना जोडणारा मार्ग) सुविधा देण्यात आली आहे.

रशियन तंत्रज्ञानाला भारतीय कौशल्याची जोड

या प्रकल्पात भारतीय अभियंते आणि कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. उत्पादनात स्थानिक घटकांचा वापर टप्प्याटप्प्याने वाढविला जात आहे. भारत आणि रशियातील तज्ज्ञ संयुक्तपणे प्रकल्पावर काम करीत असून, ३० हून अधिक रशियन विशेषज्ञ भारतीय सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. लातूरमधील ४० हून अधिक कर्मचाऱ्यांना रशियातील उत्पादन केंद्रे आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये वेल्डिंग, पेंटिंग, बॉडी असेंब्ली तसेच औद्योगिक सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

स्थानिक युवकांसाठी रोजगाराची संधी

प्रकल्पामुळे मराठवाड्यातील युवकांना रोजगार आणि कौशल्यविकासाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे नियोजन असून, सुमारे ६० टक्के कर्मचारी नियुक्त आहेत. आयटीआय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे उत्पादन क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर तयार होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती किनेट रेल्वे सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक के. सत्यामूर्ती यांनी दिली.

३५१ एकरांवर प्रकल्पाचा विस्तार

लातूरमधील उत्पादन प्रकल्प ३५१ एकर परिसरात विस्तारलेला असून, येथे ६ कार्यशाळा आणि ८.६ किलोमीटर लांबीचा अंतर्गत रेल्वेमार्ग उभारण्यात आला आहे. उत्पादन प्रक्रियेत स्थानिक पुरवठादार, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांना संधी मिळत आहे. शेती आणि साखर उद्योगावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यात रेल्वे उत्पादनासारख्या आधुनिक उद्योगाची वाढ महत्त्वाची मानली जात आहे.

दिल्ली, जोधपूर, बंगळूर येथे देखभाल केंद्र

लातूरमध्ये उत्पादन केंद्र, हैदराबादमध्ये अभियांत्रिकी केंद्र, तर दिल्ली, जोधपूर आणि बंगळूर येथे देखभाल केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. वंदे भारत स्लीपरच्या निर्मितीमुळे स्थानिक पुरवठा साखळी विस्तारण्याबरोबरच उद्योगांना आणि रोजगाराला चालना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात आधुनिक रेल्वे उत्पादन क्षेत्राचे नवे केंद्र विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.