चंद्रपूर: वरोरा येथील महादेव गुलाबराव आसेकर या व्यक्तीने स्वतःला ‘भारताचा स्वयंघोषित पंतप्रधान’ संबोधत पोलिस आयुक्तांकडे स्वरक्षणार्थ बंदूकीसाठी नाहरकत प्रमाणपत्र घरपोच देण्यात यावे अशी मागणी केली आहे. या स्वयंघोषित पंतप्रधानांची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे.वरोरा या तालुक्याच्या गावातातील रहिवासी असलेल्या महादेव आसेकर यांना शेत जमीन विक्रीनंतर काही कोटी रुपये मिळाले आहे.
या पैशातून आसेकर यांनी वरोरा येथे बंगला बांधला. तसेच खासदार आमदार यांच्याकडे असलेली फार्च्यूनर कार घेत कॅबिनेट दर्जाचा व्यक्ती असल्याची बतावणी सर्वत्र करीत आहे. हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही तर स्वयंघोषित पंतप्रधान पदावर नियुक्ती झाल्याचा दावा करत स्वतःच्या रक्षणासाठी बंदुकीचे प्रमाणपत्र घरपोहोच देण्याची मागणी केली आहे.
आसेकर यांनी नागपूर विभागाचे पोलिस आयुक्त तसेच चंद्रपूर पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या अर्जात, ‘मी स्वतःच्या इच्छेने भारताच्या पंतप्रधानपदावर नियुक्त झालो आहे. त्यामुळे पंतप्रधानांना मिळणारे प्रमाणपत्र तसेच अंगरक्षणासाठी पिस्टल (बंदूक) तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे,’ अशी मागणी नमूद केली आहे.
विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज करण्यापूर्वी वरोरा पोलिस स्टेशन येथे अर्ज दिला; मात्र वरिष्ठ अधिकारी मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अर्जात पुढे वरोरा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित पदावर वर्षा तंदूलकर यांची ‘पोलिस निरीक्षक (ठाणेदार)’ म्हणून नियुक्ती करावी, अशीही मागणी अर्जदाराने केली आहे. या विलक्षण अर्जाची चर्चा वरोरा शहरातच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

