लोकसत्ता टीम नागपूर : विदर्भातील दर्जेदार शास्त्रीय संगीत महोत्सव म्हणून नावारूपाला आलेला व स्मृतिदिनी आयोजित केला जाणारा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह यावर्षी मात्र त्यांच्याच नावाने असलेले सभागृह उपलब्ध होत नसल्यामुळे प्रथमच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला स्थगित करावा लागला आहे. विदर्भाचे सुपुत्र ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीनिमित्त नागपुरात सिव्हिल लाईन भागात त्यांच्या नावाने भव्य, आकर्षक अशा सभागृहाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या स्मृतीनिमित्त तीन ते चार दिवस शास्त्रीय संगीत समारोह सुरू करण्यात आला. या समारोहाच्या आयोजनाची जबाबदारी १९९१ पासून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडे देण्यात आल्यानंतर गेल्या ३२ वर्षांपासून सातत्याने या संगीत समारोहाचे आयोजन केले जात आहे. या संगीत समारोहाच्या निमित्ताने दरवर्षी स्थानिक कलावंतांसह जगभरातील गायक, वादक हजेरी लावत असल्यामुळे केवळ नागपुरातील नाही विदर्भातील संगीत रसिक या महोत्सवासाठी येत असतात. आणखी वाचा-आधीच जिल्हा चिंब, आता यलो अलर्ट; कोट्यवधीचे रस्ते, पिके गेलीत वाहून पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्साची जशी ओळख आहे तशीच ओळख गेल्या काही वर्षात नागपुरातील या वसंतराव देशपांडे स्मृती समारोहाची झाली होती. मात्र यावेळी वसंतराव देशपांडे सभागृहाची वातानुकूलित व्यवस्था बंद असल्यामुळे आणि येथील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे केंद्राला संगीत समारोहासाठी सभागृह उपलब्ध करून देण्यात आले नाही. वसंतराव देशपांडे यांच्या नावाने हा संगीत समारोह असल्यामुळे तो सभागृहात व्हावा असा केंद्राचा आग्रह असतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने सभागृहात सोयीसुविधा नसल्यामुळे तो उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे केंद्रावर यावर्षी प्रथमच वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाची परंपरा खंडित झाली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून केंद्राच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोहाचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी स्थानिक कलावंतांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत या महोत्सवात हजेरी लावत असतात. मात्र यावर्षी सभागृहातील अव्यवस्थेमुळे ते आम्हाला उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे महोत्सव तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. -दीपक कुळकर्णी, सहायक संचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणखी वाचा-चंद्रपूर: एका हातात चप्पल, दुसऱ्या हाताची साखळी; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना… ‘सभागृहाची स्थिती सुधारावी’ सभागृहातील वातानुकूलित व्यवस्था बंद आहे. अनेक ठिकाणी खुर्च्या तुटलेल्या आहेत. रंगमंचासह आत असलेल्या खोल्यामध्ये अस्वच्छता आहे. दर्जेदार कार्यक्रमांना महागडे प्रवेश शुल्क भरून कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या रसिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सभागृहाची स्थिती लवकरात लवकर सुधारण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.