scorecardresearch

यवतमाळ : रॅगिंग भोवली, पाच विद्यार्थी अखेर निलंबित ! ; यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

यवतमाळ : रॅगिंग भोवली, पाच विद्यार्थी अखेर निलंबित ! ; यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( फोटो सौजन्य : फेसबुक )

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्याप्रकरणी पाच वरिष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याची तक्रार पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे. त्यामुळे या घटनेची आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून, सोमवारी विद्यापीठाची पाच सदस्यीय समिती चौकशीसाठी येणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : पूरग्रस्त भागात घराचे बांधकाम, प्लॉट खरेदीची जबाबदारी नागरिकांची

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या डॉ. अनमोल भामभानी याचा वरिष्ठ सहकाऱ्यांनी सातत्याने शारीरिक, मानसिक छळ केल्याने त्याला ‘सोल्युलायटीस’सारखा गंभीर जडल्याची तक्रार २३ ऑगस्टला त्याची आई जुही भामभानी यांनी अधिष्ठातांकडे केली होती. या तक्रारीनंतर चार सदस्यीय चौकशी समितीने प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविले होते. शल्यक्रिया गृहातील परिचारिकेसह सर्वांचा इनकेमेरा जबाब घेण्यात आला. या समितीने अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांच्याकडे शुक्रवारी सायंकाळी अहवाल सादर केला. त्यानंतर या रॅगिंग प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेले डॉ. ओंकार कवतिके, डॉ. अनुप शहा, डॉ. साईलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियंका साळुंखे व डॉ. पी.बी. अनुशा यांना निलंबित करण्यात आले.

हेही वाचा – आता फक्त सोमवारी व गुरुवारी होणार प्रशासनाच्या दृक् श्राव्य बैठका

रॅगिंगविरोधी समितीतील विद्यार्थ्यांकडूनच रॅगिंग?
मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा महाविद्यालयात आहे. जे विद्यार्थी अँटी रॅगिंग कमिटीत आहेत तेच विद्यार्थी रॅगिंग घेत असल्याचा प्रकार घडल्याने त्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप अनमोलच्या पालकांनी केला आहे. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अधिष्ठाता व विभाग प्रमुखांनी दोन ते तीन तास बसवून ठेवत, या प्रकाराने करिअर संपुष्टात येण्याची भीती दाखविल्याचाही आरोप होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आठ पैकी सहा विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाल्याची कबुली चौकशी समितीसमोर दिल्याची माहिती आहे. वैद्यकीय शिक्षण विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली असून अहवाल मागविल्याचे सांगण्यात येते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ न्यूज ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasantrao naik government medical college five raging students were finally suspended amy

ताज्या बातम्या