नागपूर : आगामी काळातील महायुद्ध ही जमीनीसाठी नव्हे तर अर्थव्यवस्थेचा ताबा मिळविण्यासाठी लढली जातील, अशी तर्कशुद्ध  मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी केली होती. सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहता, त्यांचे हे विश्लेषण तंतोतंत खरे ठरत आहे, असे निरीक्षण वंचित बहूजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे नोंदविले.

ऑपरेशन सिंदूर आणि नंतरच्या घडामोडी हा विषय केंद्रस्थानी ठेवून आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. चारित्र्यहिन जर देशाच्या सत्तेवर बसला तर अर्थव्यवस्था ताब्यात घेणे सोपे होते. जगाच्या पाठीवर सर्वत्र हेच घडत आहे. वयोवृद्धांच्या प्रदेशात क्रयशक्ती संपत चालल्याने जगाची अर्थव्यवस्था कोलमडत आहे. दुसऱ्या बाजूला क्रयशक्ती वाढत चाललेला भारत मोठी बाजारपेठ बनत आहे. त्यामुळे देशात  आगामी काळात शांतता राखायची असेल तर आपली बाजारपेठ कोणाला, किती आणि कशी खुली करून द्यायची, हे भारताने ठरविण्याची वेळ आली आहे.

ट्रम्प धार्जिण्या धोरणांमुळे जिंकलेली लढाई हरलो

चालून आलेली एकही संधी सोडायची नसते, हा राजकारणातला पहिला नियम आहे, असे स्पष्ट करीत थेट विषयाला हात घालत अॅड. आंबेडकर म्हणाले,  देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या युद्धात बांगलादेशच्या रुपाने पाकिस्तानचे तुकडे करीत हे धाडस केले. अगदी तशीच सुवर्ण संधी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने निर्माण करून दिली होती. दहशतवाद्यांचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवत त्याचे पाच तुकडे करता आले असते. मात्र ट्रंप धार्जिण्या सरकारने ही संधी गमावल्याने देशाला जिंकलेल्या युद्धातून माघार घ्यावी लागली, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका कधी

देशातील मुस्लिम भविष्यात छातीवर बसतील, अशी ओरड धर्मांध शक्ती पूर्वीपासून करीत आहे. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही हेच कानी पडते. वास्तविक पाकिस्तानातील मुस्लिम आणि भारतीय मुस्लिमांमध्ये टोकाचा फरक आहे. भारतीय मुस्लिमांमधील संत परंपरा पाकिस्तानात नाही, याकडे डोळे झाक केली जाते. व्हिलनच्या  भूमिकेत बसविलेल्या मुस्लिमांची सुटका कधी करणार, असा थेट सवाल अॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. आगामी काळात यातून होणाऱ्या संघर्षाच्या भेगा वाढल्या तर त्याला भगदाड पडण्यास वेळ लागणार नाही, अशी भितीही त्यांनी व्यक्त करून दाखविली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चळवळीतले ‘मौनीबाबा’ देशासाठी घातक

विचारांचा धगधगता अंगार हा बहुजन चळवळीचा आत्मा होता. तोच हरविल्याची खंत व्यक्त करीत अॅड. आंबेडकर म्हणाले, फुले शाहू आंबेडकर चळवळीने घेतले मौन धोकादायक आहे. आज चळवळ व्यक्तीगत प्रश्नाच्या अवती भवती भरकटत आहे. फुले शाहू आंबेडकर चळवळीने देशाला संकटात टाकणाऱ्या विचारांविरोधात हिंमतीने, निर्भयतेने मतदान केले पाहिजे, अशी सादही त्यांनी घातली.