महेश बोकडे
नागपूर : जड मालवाहू वाहन व जास्त क्षमतेच्या प्रवासी वाहनांची १ एप्रिल २०२३ आणि मध्यम मालवाहू व मध्यम प्रवासी वाहनांची १ जून २०२४ पासून ‘स्वयंचलित ट्रॅक’वरच योग्यता तपासणी करावी, असे परिपत्रक केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने काढले. परंतु राज्यात या पद्धतीचा केवळ एकच ट्रॅक कार्यान्वित असल्याने त्याची अंमलबजावणी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्याच्या परिवहन मंत्रालयाने जड मालवाहू आणि जास्त क्षमतेच्या प्रवासी वाहनांच्या अचूक योग्यता तपासणीसाठी नाशिकमध्ये स्वयंचलित ट्रॅक तयार केला. या पद्धतीचे ट्रॅक राज्याच्या इतरही भागात तयार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात नागपूरसह इतर अनेक जिल्ह्यात स्वयंचलित ट्रॅक तयार झालेल्या नाही. कुठे जागेची समस्या तर कुठे निधीची कमतरता, यामुळे ही योजना रखडली आहे. दरम्यान, ५ एप्रिलला केंद्र सरकारने नवे परिपत्रक काढून जड मालवाहू वाहने व जास्त क्षमतेच्या प्रवासी वाहनांची १ एप्रिल २०२३ नंतर तर मध्यम मालवाहू वाहने व मध्यम प्रवासी क्षमतेच्या वाहनांची १ जून २०२४ पासून स्वयंचलित ट्रॅकवरच योग्यता तपासणी बंधनकारक केली आहे. राज्यात तूर्त हा ट्रॅक नाशिकलाच असून लातूरला एक खासगी ट्रॅक आहे.
योग्यता तपासणीचे निकष
केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या सूचनेनुसार आठ वर्षांपर्यंतच्या मालवाहू वा प्रवासी वाहनांना दोन वर्षांनी तर त्याहून अधिक वयोमान असलेल्या वाहनांना प्रत्येक वर्षी योग्यता तपासणी करणे बंधनकारक आहे.
‘‘परिवहन खात्याकडून राज्यातील २३ आरटीओ कार्यालयांत स्वयंचलित ट्रॅक तयार करण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कार्यालयात ट्रॅक तयार केले जातील. हे काम वेळेवर झाल्यास निश्चितच सर्व योग्यता तपासण्या या मानवरहित स्वयंचलित ट्रॅकवरच होतील.’’ – डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.