वर्धा : खगोलप्रेमींसाठी मंगळवार,आज ९ जून २०२६ ची संध्याकाळ अत्यंत खास आणि विशेष असणार आहे. सूर्यमालेतील दोन सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह, ‘शुक्र’ (Venus) आणि ‘गुरु’ (Jupiter) आजच एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत.दिसणार आहे. खगोलशास्त्रामध्ये या विहंगम दृश्याला ‘ग्रहांची युती’ (Conjunction) असे म्हटले जाते. महाराष्ट्रात संपूर्ण शहरासह संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून ही नाविन्यपूर्ण आणि खगोलीय खगोलीय घटना आपल्याला उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार आहे.

असे आहे विज्ञान वृत्त

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘नॅशनल जिओग्राफिक’ (National Geographic) संस्थेने आपल्या विज्ञान वृत्तात (Science Report) या अद्भुत खगोलीय घटनेचे ‘कॉस्मिक किस’ (Cosmic Kiss) असे अतिशय सुंदर आणि रोमँटिक वर्णन केले आहे.

आपण जेव्हा पृथ्वीवरून हे दृश्य पाहू, तेव्हा शुक्र आणि गुरु हे दोन ग्रह अवघ्या १.५ ते १.६ अंश (Angular Distance) कोणीय अंतरावर दिसतील. जर आपण आपल्या हाताचे लहान बोट डोळ्यांसमोर धरले, तर ते आकाशातील जेवढी जागा व्यापते, साधारण तेवढ्याच अंतरावर हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या शेजारी चमकताना दिसतील. पश्चिम आकाशात सूर्यास्तानंतर लगेचच, म्हणजे संध्याकाळी ७:३० ते रात्री ८:३० या वेळेत हे विहंगम दृश्य अनुभवता येईल.

लखलखणारा शुक्र

अंधार पडू लागताच पश्चिम क्षितीजावर मिथुन आणि कर्क राशीच्या दरम्यान हिऱ्यासारखा लखलखणारा शुक्र आणि त्याच्या शेजारी काहीसा पिवळसर रंगाचा भव्य गुरु ग्रह नागरिकांना स्पष्टपणे पाहता येईल. साधारण ८:३० नंतर हे ग्रह क्षितीजाखाली मावळू लागतील, त्यामुळे ७:४५ ते ८:१५ ही वेळ निरीक्षणासाठी सर्वोत्तम असेल.

प्रसिद्ध तथा नामवंत म्हणतात

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ही घटना म्हणजे अंतराळातील एक सुंदर ‘दृष्टीभ्रम’ (Optical Illusion) आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आलेले नसतात. युतीदरम्यान शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे १८ कोटी किलोमीटर अंतरावर असेल, तर गुरु ग्रह तब्बल ९० कोटी किलोमीटर अंतरावर असणार आहे. त्यांच्यातील प्रत्यक्ष अंतर कोट्यवधी किलोमीटरचे आहे. परंतु, पृथ्वीवरून पाहताना ते एकाच दृष्टीरेषेत (Line of Sight) आल्यामुळे ते अगदी शेजारी आल्याचा भास आपल्याला होतो.सूर्यमालेतील सर्व ग्रह एकाच काल्पनिक पातळीत (क्रांतीवृत्त) सूर्याभोवती फिरतात, परंतु प्रत्येकाचा भ्रमणवेग वेगवेगळा असतो. शुक्र अवघ्या २२५ दिवसांत सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, तर गुरुला यासाठी सुमारे १२ वर्षे लागतात. वेगवेगळ्या गतीचे हे ग्रह फिरता फिरता जेव्हा पृथ्वीवरून पाहताना एका सरळ रेषेत येतात, तेव्हा अशी युती घडून येते.

एक मोठी विषमता

या युतीच्या निमित्ताने अंतराळातील एक मोठी विषमताही पाहायला मिळते. आज जे दोन ग्रह आपल्याला शेजारी दिसतील, त्यापैकी शुक्राला स्वतःचा एकही नैसर्गिक चंद्र (उपग्रह) नाही. सूर्याच्या अतिप्रबळ गुरुत्वाकर्षणामुळे आणि स्वतःच्या संथ अक्षीय गतीमुळे शुक्राला उपग्रह लाभलेला नाही.हे विशेष म्हणावे लागेल. याउलट, आपल्या सौरमालिकेतील गुरु हा सूर्यमालेतील ‘उपग्रहांचा राजा’ मानला जातो. गुरुला सध्याच्या संशोधनानुसार ९५ अधिकृत चंद्र आहेत.असे.नुकत्याच खगोलीय पाहणीत आले आहेत. वस्तुतः जर आपण आज, साध्या बायनॉक्लर्स किंवा लहान दुर्बिणीतून पाहिले, तर गुरुच्या शेजारी त्याचे आयो, युरोपा, गॅनिमिड आणि कॅलिस्टो हे चार मोठे ‘गॅलिलियन चंद्र’ (Galilean Moons) स्पष्टपणे लहान ठिपक्यांसारखे पाहता येतील.

अंधश्रद्धेला बळी पडू नका

महाराष्ट्रातील , सध्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, आजही संध्याकाळी आकाश मुख्यत्वे निरभ्र राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या आकाश निरीक्षणात कोणताही मोठा अडथळा येणार नाही. खगोल विश्लेषकांच्या मते, अशा खगोलीय घटनांचे मानवी जीवनावर किंवा राशींवर कोणतेही बरे-वाईट ज्योतिषीय प्रभाव पडत नसतात. हे केवळ केपलरच्या ग्रहांच्या गतीविषयक नियमांचे आणि भौमितिक मांडणीचे एक सुंदर नैसर्गिक गणित आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या घराच्या गच्चीवरून किंवा मोकळ्या जागेतून या विलोभनीय खगोलीय दृश्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन विविध खगोलप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते अविनाश टाके यांनी केले आहे.