scorecardresearch

नागपूर : कुलगुरू डॉ. चौधरींनी केलेली नियुक्ती पुन्हा वादात, उच्च न्यायालयाची नोटीस

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखीय शाखेच्या अधिष्ठातापदी केलेली निवड अंगलट आली आहे.

nagpur bench of bombay hc rejects advocate surendra gadling bail
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा नवीन नियुक्तीवरून वादात सापडले आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखीय शाखेच्या अधिष्ठातापदी केलेली निवड अंगलट आली आहे.

कुलगुरूंनी अपात्र व्यक्तीची नियुक्ती केल्याचा आरोप करत माजी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी थेट राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि डॉ. प्रशांत कडू यांना प्रतिवादी केले आहे. सोमवारी याप्रकरणी याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेत उच्च न्यायालयाने राज्यपालांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास

नागपूर विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय शाखेत शिक्षण, शारीरिक शिक्षण, जनसंवाद, ग्रंथालय आणि कायदा या क्षेत्रांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत आंतरविद्याशाखीय शाखेचे अधिष्ठाता म्हणून या शाखांमधून तज्ज्ञ व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे कुलगुरूंनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या डॉ. प्रशांत कडू यांची या शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीपूर्वीही हा विषय चर्चेत होता. सुरुवातीपासूनच विविध स्तरातून याला विरोध होत होता. मात्र, सर्व विरोध डावलून डॉ. कडू यांना अधिष्ठाता करण्यात आले. त्यावेळीही याचिकाकर्त्याने या संपूर्ण प्रकरणाची राज्यपालांकडे तक्रार केली. परंतु, यावर काहीही झाले नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 09:28 IST