वाहतूक व्यवस्था विस्कळीत; नागरिकांचा मन:स्ताप

शहरात मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे नागरिक त्रस्त असताना शुक्रवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दौऱ्याने वाहतूक कोंडीत भर घातली. अ‍ॅग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपराष्ट्रपतींनी राज्यशिष्टाचार (प्रोटोकॉल) मोडून स्मृती मंदिर परिसरात बराच वेळ घालवल्याने त्यांच्यासाठी रोखून धरलेली वाहतूकही बराच काळ थांबवण्यात आली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती आणि नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.

रेशीमबाग मैदानावर अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले. सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास कार्यक्रम संपला. त्यानंतर उपराष्ट्रपती थेट डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानळावरून विमानाने भूवनेश्वर येथे जाणार होते. मात्र, उपराष्ट्रपतींनी अचानक त्यांच्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. अ‍ॅग्रोव्हिजनचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते बाजूलाच असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती भवनाला भेट देण्यासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर मंदिराच्या स्वागत कक्षात जवळपास १५ ते २० मिनिटे बसले. तेथे त्यांनी अनेकांशी संवाद साधला. अ‍ॅग्रोव्हिजनच्या कार्यक्रमानंतर ते थेट आंतरराष्ट्रीय विमानतळावर जातील, अशी माहिती नागपूर पोलीस व वाहतूक पोलिसांना होती. त्यामुळे कार्यक्रम संपताच वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणची वाहतूक रोखून धरली होती. परंतु, बराच वेळ उलटल्यानंतरही उपराष्ट्रपतींचा ताफा येत नसल्याने पोलीस धक्का बसला.

मात्र, जवळपास अर्धा ते पाऊण तास सिग्नलवरील वाहतूक रोखून धरल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि लोक वाहतूक पोलिसांशी वाद घालत होते. नागरिक व वाहतूक पोलिसांमध्ये ठिकठिकाणी वाद झाले. मात्र, पोलिसांनी उपराष्ट्रपतींचा ताफा जाईपर्यंत वाहतूक रोखूनच धरून ठेवल्याने नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. शेवटी उपराष्ट्रपती विमानतळावर पोहोचले आणि वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यासंदर्भात वाहतूक पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.