बुलढाणा : भारतीय विज्ञान विभागगाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. यानुसार बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात आठवडाभर पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. नागपूर केंद्राच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात ८ जुलैला सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ जुलैला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून त्यानंतर १० ते १३ जुलैदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे.

विदर्भाचा अंदाज

याचबरोबर विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचीही शक्यता असल्याचे अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

या दक्षता घ्याव्या

संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे. मेघगर्जना व वीजांचा कडकडाट होत असताना उघड्या जागेत थांबणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन हवामान केंद्र आणि प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.