हिंगण्यात भाजपची सरशी; कुहीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

नागपूर : विदर्भात नगरपंचायतींच्या ४९३ जागांपैकी १७५ हून अधिक जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यापाठोपाठ भाजपने जागा जिंकल्या. नागपूर जिल्ह्यात झालेल्या दोन पंचायतीच्या निवडणुकीत हिंगण्यात भाजपने १७ पैकी ९ जागा मिळवत बहुमत प्राप्त केले तर कुही येथे १७ पैकी ८ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. बुधवारी सकाळी दोन्ही ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपापर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. जिल्ह्याचे सर्व लक्ष हिंगणा नगर पंचायत निवडणूक निकालाकडे लागले होते. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते. या भागाचे भाजपचे आमदार समीर मेघे यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनोही पूर्ण तयारीनिशी रिंगणात होती. भाजपने १७ पैकी ९ जागा जिंकत सत्ता कायम राखली. राष्ट्रवादीला ५ तर शिवसेनेला १ जागा मिळाली. २ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. राज्यात भाजपच्या कार्यकाळात हिंगण्यात झालेल्या विकास कामांमुळे जनतेने पक्षाला कौल दिला अशी प्रतिक्रिया , भाजप आमदार समीर मेघे यांनी व्यक्त केली.

lok sabha election 2024, nagpur, ramtek, chandrapur, gadchirlo, bhadara, gondia, voting, first pahse
पूर्व विदर्भात पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती
Lok Sabha election 2024 Heavy marching in North Nagpur Predominance of Congress and BJP is also ready
रणसंग्राम लोकसभेचा : उत्तर नागपुरात जोरदार मोर्चेबांधणी; काँग्रेसचे प्राबल्य, भाजपही सज्ज!
Lok Sabha elections in Telangana between Congress and BJP
तेलंगणमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यात चुरस
Challenge of two women candidates before Asaduddin Owaisi
ओवैसींसमोर यंदा दोन महिला उमेदवारांचे आव्हान; कसा राखणार हैदराबाद मतदारसंघ?

कुही नगर पंचायतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे, माजी आमदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात केलेले नियोजन यशस्वी झाल्याचे दिसून येते. येथे १७ पैकी ८ जागा जिंकून काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे. भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी चार जागा मिळाल्या. एक जागा अपक्षाने जिंकली. दरम्यान, विदर्भातील २९ नगर पंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने १७५, भाजपने ११७, सेना ४८, राष्ट्रवादीने ६५ जागा जिंकल्या इतर ठिकाणी अपक्ष, स्थानिक आघाडय़ा व इतर पक्षाला यश मिळाले. काँग्रेस नेते व राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात सावली, सिंदेवाही, काँग्रेस नेत्या व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती जिल्ह्यात  तिवसा नगरपंचायतीत काँग्रेसला बहुमत मिळाले. भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील पोंभूर्णा नगरपंचायत भाजपने जिकंली. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने बुलढाणा जिल्ह्यात खाते उघडले असून तेथील संग्रामपूर नगरपंचायतीत संघटनेने बहुमत मिळवले आहे. नागपूर जिल्ह्यात सुनील केदार व नितीन राऊत असे काँग्रेसचे दोन मंत्री आहेत. या जिल्ह्यातील हिंगणा व कुही या दोन नगर पंचायतीत निवडणुका झाल्या. मात्र  एकाही ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळाले नाही. हिंगण्यात भाजपचे विद्यमान आमदार समीर मेघे यांच्या नेृतृत्वात भाजपने १७ पैकी ९ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. बडनेराचे अपक्ष  आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेने जिल्ह्यातील भातकुली नगर पंचायतीवर विजय मिळवला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सहा नगर पंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. त्यात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून गतवैभव मिळवले. या सहाही नगर पंचायतींमध्ये भाजपचे आमदार असताना पक्षाला राळेगाव व झरी जामणी येथील सत्ता गमावून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे संख्याबळ २५ वर गेले. तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात प्रभावहीन असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. अमरावती जिल्ह्यात तिवसा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या. या ठिकाणी भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. तुलनेत शिवसेनेची कामगिरी समाधानकारक राहिली. सेनेला चार जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील आपले खाते उघडता आले नाही. या निकालाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बळ मिळाले आहे.

भातकुली नगरपंचायत निवडणुकीत ९ जागा जिंकून युवा स्वाभिमान पक्षाने बहुमत मिळवले आणि सलग दुसऱ्यांचा सत्ता काबीज केली. या निकालाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेला ३, भाजपला २, काँग्रेसला १ आणि अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत. येथेही भाजपला अपेक्षेनुरूप यश मिळवता आले नाही. सोबतच काँग्रेसलाही चमक दाखवता आली नाही. बुलढाणा जिल्ह्यातील नगर पंचायतींच्या निवडणुकीत मोताळय़ात काँग्रेसचा झेंडा फडकला असून संग्रामपूरमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. वाशिम जिल्ह्यात  मानोरा नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व निर्माण केले. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १४ जागांवर बाजी मारली. काँग्रेसला दोन, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला खातेही उघडता आले नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात घवघवीत यश संपादन केले. सहापैकी सावली, कोरपना, सिंदेवाही आणि गोंडिपपरी याठिकाणी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. जिवती येथे काँग्रेस- राष्ट्रवादी युतीने बाजी मारली तर पोंभूर्णा नगर पंचायत माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा ताब्यात घेतली. सहा नगर पंचायतीच्या १०२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ५३ उमेदवार निवडून आले. तर भाजपचे कमळ २४ ठिकाणी फुलले, शिवसेना सहा, गोंडवाना गणतंत्र पार्टी पाच, बहुजन वंचित आघाडी दोन आणि अपक्ष चार उमेदवार निवडून आले. गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव आणी आमगाव पंचायत समितीत भाजपचीच सत्ता राहणार असून फक्त काँग्रेसकडे सालेकसा पंचायत समिती राहणार असल्याचे बुधवारी लागलेल्या निकालातून स्पष्ट झाले आह़े

गोंदिया जि.प.वर भाजपचा, भंडारा जि.प.वर काँग्रेसचा वरचष्मा

गोंदिया जिल्हा परिषदेतील एकूण ५३ पैकी ५० जागांचे निकाल जाहीर झाले यात भाजपने २५ जागा जिंकल्या तर काँग्रेसला १२ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागा मिळाल्या. स्थानिक जनता की पार्टीला ४ जागा तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे.  भंडारा जिल्हा परिषदेच्या  ५२ जागांपैकी २२ जागा जिंकत काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला  १३ जागा व भारतीय जनता पक्षाला १२ जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीला १ व बहुजन समाज पक्षाला १ व अपक्ष ३ जागांवर निवडून आलेले आहेत. भंडाऱ्यात  काँग्रेसला बहुमत न मिळाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना धक्का बसला आहे.